नाराज खासदार संभाजी राजे मातोश्रीवर; मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 12:44 PM2019-12-29T12:44:48+5:302019-12-29T12:45:23+5:30
कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असे संभाजी राजेंनी काल म्हटले होते.
मुंबई : रायगड किल्ल्यावर परवानगी नसताना देखील रोप-वेचं काम सुरु असल्याचा आरोप रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केला होता. गडावर एखाद बांधकाम करायचं असल्यास त्यासाठी अनेक नाहरकतींची आवश्यकता असते, हा नियम रोप- वे वाल्यांना लागू नाही का, असा सवाल देखील संभाजीराजे यांनी उपस्थित केला होता. या प्रश्नावर त्यांनी आज मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
रायगड प्राधिकरणाच्या बैठकीनंतर अलिबाग येथे जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले की, रायगड किल्ला संवर्धनाच्या कामात खाबूगिरी आणि बाबूगिरीचा शिरकाव झाला आहे. तसेच रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणारी कामं पुरातत्व विभागाकडून रोखली जात असल्याचा आरोप संभाजीराजे यांनी केला आहे. रोप-वे चा मनमानी कारभार असाच चालणार असेल तर आपल्याला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा देखील संभाजीराजे यांनी दिला आहे.
यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी रोप वेच्या कंपनीला नोटीस पाठविली होती. सरकारच्या पुरातत्व विभागाच्या या दुटप्पी भूमिकेवर नाराजी व्यक्त करण्यासाठी संभाजी राजे नुकतेच मातोश्रीवर दाखल झाले आहेत.