'आता कळलं असेल मराठा आरक्षणासाठी लढा उभारणं का गरजेचं होतं'; संभाजी राजेंकडून विद्यार्थ्यांचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 01:30 PM2020-06-22T13:30:16+5:302020-06-22T13:30:29+5:30
खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी फेसबुकवर पोस्ट करत सर्व भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे.
राज्य लोकसेवा आयोगाचा नुकताच निकाल लागला आहे. या निकालामध्ये मराठा समाजातील मुला-मुलांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. ग्रामीण तसंच शहरी भागातील मराठा समाजातील मुलांना अनेक मोठ-मोठी पदं मिळाली आहेत. यावर खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी फेसबुकवर पोस्ट करत सर्व भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं आहे.
छत्रपती संभाजी राजे म्हणाले की, MPSC परीक्षेतुन निवड झालेल्या सर्व भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे अभिनंदन. मराठा समाजातील मुलांची संख्या बघून समाधान वाटलं. आरक्षणासाठीचा लढा उभारणं का गरजेचं होतं, हे कालच्या निकालाने सिद्ध झालं, असं संभाजी राजे यांनी सांगितले.
माझे सर्व समाजातील यशस्वी विद्यार्थ्यांना आवाहन आहे की, येणाऱ्या काळात महाराष्ट्रापुढे अभूतपूर्व आव्हाने उभे राहतील, त्या आव्हानांना सक्षमपणे तोंड देण्याकरिता प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही स्वतः सिद्ध व्हाल, आणि महाराष्ट्राच्या उत्कर्षात सर्वोच्च योगदान द्याल ही अपेक्षा, असं भावना संभाजी राजे यांनी व्यक्त केली आहे.
मराठा आरक्षणामुळे जवळपास १२७ तरुण विद्यार्थी अधिकारी झाले आहे. त्यामुळे हे यश छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरलेल्या सर्वांच आहे. हे यश ५० पेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलं त्यांच असल्याचे मराठा आरक्षणाचा न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील यांनी सांगितले. तसेच आपली लढाई थांबलेली नसून सर्वोच्च न्यायालयामध्ये हे आरक्षण टिकवणे ही राज्य सरकार आणि विरोधी पक्ष या दोघांची जबाबदारी असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एकूण १७ संवर्गातील ४२० पदांसाठी २०१९ मध्ये घेतलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गात, सर्वसाधारण वर्गवारीतून साताऱ्याचा प्रसाद बसवेश्वर चौगुले याने ५८८ गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.