२५ जानेवारीला गडबड झाल्यास जबाबदारी राज्य सरकारची; संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 11:20 AM2020-12-24T11:20:49+5:302020-12-24T11:21:54+5:30
Maratha Reservation: ईडब्ल्यूएस आरक्षणाला विरोध नाही. पण याचा धोका एसईबीसीला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का?; संभाजीराजेंचा सवाल
पुणे: मराठा समाजाला ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेणाऱ्या ठाकरे सरकारवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी जोरदार टीका केली आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणाला माझा विरोध नाही. पण याचा धोका एसईबीसीला होणार नाही, याची हमी सरकार घेणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आता २५ जानेवारीला सुनावणी होणार आहे. त्यात काहीतरी गडबड होऊ शकते असा संशय संभाजीराजे यांनी व्यक्त केला. 'सरकार आरक्षणाबद्दल सकारात्मक असल्याचं मी आतापर्यंत म्हणत होतो. पण आता मला गडबड वाटत आहे. २५ जानेवारीला मराठा समाजाच्या आरक्षणावर सुनावणी होणार आहे. पण त्याआधीच सरकार हतबल झाल्यासारखं दिसत आहे. म्हणूनच हा ईडब्ल्यूएसचा मुद्दा रेटला जात आहे का?', असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला. २५ जानेवारीच्या सुनावणीत गडबड झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असा पवित्रा त्यांनी घेतला.
मराठा समाजाला मिळणार ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ, मंत्रिमंडळाचा निर्णय
मराठा समाजाला बहुजन समाजापासून लांब ठेवलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचा वंशज असल्यानं हे माझ्या लक्षात आल्याचं संभाजीराजे म्हणाले. विद्यार्थ्यांचं नुकसान होत असल्याचं सांगत राज्य सरकारनं काल आर्थिक दुर्बल घटक म्हणून आरक्षण दिलं. पण सुपर न्यूमर पद्धतीनं ठरलेलं असताना अचानक EWSचा मुद्दा आला कुठून? असा प्रश्न संभाजीराजेंनी राज्य सरकारला विचारला.
...मग तुम्हाला शाहू महाराजांचे पाईक म्हणवण्याचा अधिकार उरत नाही- संभाजीराजे
शाहू महाराज यांचा पुरोगामी विचार जपायचा असेल तर सारथी संस्थेच्या मुद्द्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घालायला हवं. सारथीच्या स्वायत्ततेचा मुद्दा वर्षभरापासून सुरू आहे. जर याबाबत निर्णय घेता येत नसेल, तर शाहू महाराजांच्या विचार मानणाऱ्यांनी ही संस्था बंद करावी. आपल्याला शाहू महाराजांच्या विचारांचे पाईक म्हणवण्याचा अधिकार उरत नाही, अशा शब्दांत संभाजीराजेंनी शरद पवारांनादेखील लक्ष्य केलं.