"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 11:00 AM2024-10-01T11:00:29+5:302024-10-01T11:04:54+5:30
Sanjay Raut Amit Shah : खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या महाराष्ट्रातील वाढत्या दौऱ्यांवर टीका केली. शाह म्हणाले, ते देशाची राजधानी महाराष्ट्रात हलवतील, असा उपरोधिक टोला राऊतांनी शाहांना लगावला.
Maharashtra Elections: विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्लीतील नेत्यांचे महाराष्ट्रातील दौरे वाढले आहेत. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीतील नेतेही राज्य पिंजून काढताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांचे दौरेही वाढले असून, त्यावर खासदार संजय राऊतांनी उपरोधिक टीका केली.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "देशाच्या गृहमंत्र्यांनी कोणते काम केले पाहिजे, यासंदर्भात संविधानामध्ये काही नियम आणि विषय आहेत. ते सगळे बाजूला ठेवून हे फक्त निवडणुका, भाजपाचा प्रचार, लाडक्या उद्योगपतींना मदत आणि विरोधकांवर हल्ले, हे गृहमंत्र्यांचे काम नाहीये."
शाहांनी सरदार पटेलांचा इतिहास वाचावा -राऊत
"सरदार पटेलांचा इतिहास त्यांनी (अमित शाह) वाचावा, गृहमंत्री म्हणून त्यांनी काय काम केले? किंवा इतर जे गृहमंत्री होऊन गेले, त्यांनी कोणते काम केले. व्यक्तिगत सूडाचं राजकारण करण्यासाठी गृहमंत्रालयाचा वापर या देशात याआधी कुणी केल्याचे मला दिसत नाही, पण अमित शाह नेमकं तेच करताहेत", असा टोला राऊतांनी लगावला.
अमित शाहांच्या महाराष्ट्रातील वाढत्या दौऱ्यांबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत बहुदा देशाची राजधानी ते महाराष्ट्रात हलवतील असं मला वाटतंय. देशाची राजधानी दिल्ली आहे, ते दफ्तर ते इथे हलवतील."
"त्यांना पराभव स्पष्ट दिसत आहे"
खासदार राऊत म्हणाले, "मोदी आणि शाहांना सारखं सारखं इथे यावं लागतंय, याचा अर्थ असा आहे की, लोकमत त्यांच्याविरुद्ध आहे. त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसत आहे. त्यांची धडपड सुरूये की, हातात काहीतरी रहावं, पडावं."
"मोदींनी एकाच मेट्रोचे सहावेळा उद्घाटन केले. अमित शाह वार्डा वार्डात बैठका घेताहेत, देशाचे गृहमंत्री. याचा अर्थ असा आहे की, राज्यातील भाजपा कूचकामी आहे. देवेंद्र फडणवीसांपासून त्यांचे सगळे इतर नेते आहेत, ते कूचकामी आहेत. त्यांनी जे लोक इथे सत्तेवर बसवली, ते कूचकामी आहे. लोक त्यांना फेकून देणार आहे, म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांना देश वाऱ्यावर सोडून या राज्यात ठाण मांडून बसावं लागत आहे", अशी टीका राऊतांनी केली.