उद्धव ठाकरेंची खेडची सभा अतिविराट होईल, दुसऱ्या सभेचं ठिकाणही संजय राऊतांनी सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 10:57 AM2023-03-05T10:57:37+5:302023-03-05T10:58:47+5:30
ज्यांना जायचं ते निघून गेले, आता उरलेत ते निष्ठावंत आहेत असं खासदार संजय राऊतांनी सांगितले.
मुंबई - उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष घातलंय. तालुकापातळीवर शिवगर्जना सभा झाल्या, रोड शो झाले. लोकांचा प्रचंड सहभाग होता. आजची खेडची सभा ज्यासभेला उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील. कोकणातील अतिविराट ही सभा असेल. कोकण हा कायम शिवसेनेचा गड, पाठिराखा राहिलाय. शिवसेनेच्या संघर्षात कोकणाचं योगदान मोठे राहिले आहे. कोकणाने नेहमी बाळासाहेबांवर आणि शिवसेनेवर श्रद्धा ठेवलीय. खेडसारख्या सभा राज्यातील अनेक भागात होतील. उद्धव ठाकरे राज्यभरात फिरतील. खेडनंतर दुसरी सभा मालेगावला होईल त्याची तयारी सुरू आहे अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, ज्यांना जायचं ते निघून गेले, आता उरलेत ते निष्ठावंत आहेत. शिवसेना आजही त्याच ताकदीने उभी आहे. कागदावर नाव, चिन्ह मिळाले परंतु शिवसेनेची जनता मिळाली नाही. जनता सुपूर्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही. अनेक कार्यकर्ते, नेते शिवसेनेत प्रवेश करतायेत हे सत्य आहे. संजय कदम हे मूळचे शिवसैनिकच आहेत. खेड आणि आसपासच्या जागा जिंकण्यासाठी या कार्यकर्त्यांचा फायदा होणार आहे असं त्यांनी सांगितले.
काश्मिरी पंडिताच्या हत्येचा वापर राजकीय फायद्यासाठी
संजय शर्मा या काश्मिरी पंडिताची पुलवामाच्या बाजारात हत्या झाली. सरकारी कार्यालयात घुसून अधिकाऱ्यांना मारले जाते. शेकडो पंडीत आजही आक्रोशाने जम्मूत रस्त्यावर बसले आहेत. पंजाबमध्ये काही ठिकाणी खलिस्तानी भूत उभे राहताना दिसते. ही जबाबदारी केवळ राज्य सरकारवर नाही तर सीमावर्ती भाग आहे. त्यामुळे केंद्राची जबाबदारी तितकीच आहे. भाजपानं संवेदनशीलतेचा राजकारणासाठी उपयोग केला. काश्मिरी पंडित मेल्यानंतर त्याचा राजकीय वापर भाजपा करते. हे कितीवेळ चालणार? असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
भाजपा-शिंदेच्या आशीर्वाद यात्रेवर टीका
भाजपानं अशा यात्रा काढून काही उपयोग नाही. आमच्या शिवगर्जना यात्रेला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला म्हणून ते मूळापासून हादरले आहे. शिवसेनेच्या जनमताचा पाठिंबा हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे. पैसाच्या जोरावर भाजपा-शिंदे गट यात्रा काढणार आहे. तुम्ही या यात्रा काढा ज्यामुळे तुमची बेईमानी आणि गद्दारी लोकांसमोर पोहचेल असं सांगत संजय राऊतांनी भाजपाच्या आशीर्वाद यात्रेवर टीका केली आहे.
...म्हणून विरोधकांनी पत्र लिहिलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी घटनात्मक पदावर बसलेत. त्यामुळे ९ विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी सीबीआय, ईडीच्या तपास यंत्रणेचा गैरवापर होतोय यासाठी पत्र पाठवले आहे. मोदींच्या संमतीने हे घडतेय हे खरे असले तरी विरोधी पक्ष गप्प बसला नाही हे जनतेला माहिती पडावं म्हणून विरोधकांनी पत्र पाठवले आहे असं राऊतांनी सांगितले.