"ब्रिटीशांपेक्षा भयंकर कायद्याचा वापर राजकीय विरोधकांना अडकवण्यासाठी होतो"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2023 01:52 PM2023-08-12T13:52:41+5:302023-08-12T13:53:28+5:30
जे तुमच्या पक्षात जातात त्यांना निर्मला वॉशिंग मशिनमधून धुवून घेतात असा टोला राऊतांनी लगावला.
मुंबई – नवाब मलिक यांना १६ महिन्यांनी जामीन मिळाला त्याचा आनंद आहे. राजकीय विरोधकांना जामीन दिला जात नाही. मी, अनिल देशमुख, नवाब मलिक आहेत. हसन मुश्रीफांनी नवीन इंजेक्शन घेतल्याने ते सुटले. राजकीय विरोधकांना अडकवण्यासाठी अनेक कायदे केलेत. देशात ब्रिटीशांपेक्षा भयंकर कायदे तुम्ही निर्माण केलेत आणि त्यातून विरोधकांना जेरीस आणण्यासाठी वापरतात असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा सरकारवर केला.
संजय राऊत म्हणाले की, जे तुमच्या पक्षात जातात त्यांना निर्मला वॉशिंग मशिनमधून धुवून घेतात. महाराष्ट्रात काय चाललंय बघा, नवाब मलिक १६ महिने तुरुंगात होते, परंतु ज्यांच्यावर असेच खटले होते त्यांना मंत्री केले आहे. जे काही चाललंय ते देश हुकुमशाहीकडे जाण्याचे लक्षण आहे. देशद्रोहाचा कायदा मागे घेतला याचे फार कौतुक करू नका. ब्रिटीशांपेक्षा भयंकर कायदाचा वापर तुम्ही राजकीय विरोधकांना संपवण्यासाठी करताय असा आरोप त्यांनी केला.
तसेच नवाब मलिक आजारी होते. १६ महिने आमदार, माजी मंत्री यांना जेलमध्ये ठेवले जाते. राजकीय विरोधकांविरोधात जो कायदा वापरला जातो तो ब्रिटीशांपेक्षा भयंकर आहे. या देशात कुणी देशद्रोही नाही. पुण्यात डॉ. प्रदीप कुरुळकर त्यांच्यावर देशद्रोहाचा कायदा लावला नाही. ज्याच्यावर कायदे लावायला हवे ते लावले जात नाही. कुरुळकर हे आरएसएसचे होते त्यांना वाचवण्यासाठी कायदा मागे घेतला का? असा सवालही खासदार संजय राऊत यांनी सरकारला विचारला.
दरम्यान, त्यांच्या हातात सत्ता, ईडी त्यामुळे सरकारे पाडली जाते. राजस्थानात पुन्हा एकदा अशोक गहलोत यांच्या नेतृत्वात काँग्रेस सरकार येईल असं वातावरण आहे. राजकीय विरोधकांचे सरकार चालू द्यायचे नाही ते पैशाच्या बळावर पाडायचे ही कोणती लोकशाही? सरकार पाडणे, ईडीचा गैरवापर करणे, राजकीय विरोधकांना अडकवणे हादेखील एकप्रकारचा देशद्रोह आहे असा आरोपही राऊतांनी केंद्र सरकारवर केला.