२४० चे २७५ खासदार कधी होतील हे कळणारही नाही; संजय राऊतांचा मोदी-शाहांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:50 AM2024-06-24T10:50:53+5:302024-06-24T10:52:27+5:30

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असून तिथून त्यांनी मोदी-शाह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

MP Sanjay Raut criticizes Narendra Modi, BJP and Eknath Shinde | २४० चे २७५ खासदार कधी होतील हे कळणारही नाही; संजय राऊतांचा मोदी-शाहांना इशारा

२४० चे २७५ खासदार कधी होतील हे कळणारही नाही; संजय राऊतांचा मोदी-शाहांना इशारा

नाशिक - आज इंडिया आघाडीचे सर्व खासदार ते संसदेच्या आवारातील गांधी पुतळ्याजवळ जमतील. २४० खासदार एकत्रित संसदेत प्रवेश करतील. प्रवेश करताना प्रत्येकाच्या हाती संविधानाची प्रत असेल. संविधान रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत हा संदेश घेऊन प्रवेश करणार आहेत. मोदी-शाह आणि त्यांच्या ईस्ट इंडिया कंपनीला विरोधी पक्ष काय असतो हे कळेल असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, गेली १० वर्ष भाजपाने विरोधी पक्ष चिरडण्याचा, दडपण्याचा प्रयत्न केला. तो विरोधी पक्ष प्रचंड ताकद घेऊन संसदेत जातोय. मोदी-शाह यांच्यासमोर पहिल्यांदाच विरोधी पक्षनेता असेल आणि तो त्यांच्यासमोर पहिल्या बाकावर बसलेला असेल. काँग्रेसचे १०० पेक्षा जास्त खासदार, आम्ही सगळे मिळून २४० खासदार हे २४० चे २७५ कधी होतील हे मोदी-शाहांना कळणार सुद्धा नाही असा इशारा त्यांनी दिला.

तसेच लोकभावना दडपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विरोधक एकत्र आवाज उचलू. आता विरोधकांचा आवाज घुमणार, मोदी-शाहांचा आवाज चालणार नाही. विरोधकांच्या २४० इंडिया आघाडीच्या खासदारांचा आवाज संसदेत चालणार असंही संजय राऊत यांनी म्हटलं तर निवडणूक आयोग ईस्ट इंडिया कंपनी गुजरातचा नोकर आहे. त्यामुळे त्यांना पैसेवाटपाचे व्हिडिओ दिसत नाहीत असंही राऊतांनी म्हटलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर घणाघात

दरम्यान, सध्याचे मुख्यमंत्री घटनाबाह्य, बेकायदेशीर आहे हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले तरीही हे सरकार निर्लज्जपणे मोदी-शाहांनी महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीला आम्ही सगळ्यांनी बांबू घातला आहे. तो अजून निघाला नाही. त्यामुळे स्वप्नातही त्यांना बांबू दिसतोय एवढा आत गेलेला आहे. विधानसभेला हा बांबू आरपार जाईल. याच बांबूचे फटके लोक या गद्दारांना रस्त्यारस्त्यावर मारतील असा घणाघात संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला आहे.

आमदारांना निधी देण्यापेक्षा शेतकऱ्यांना द्या

महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक, दूध उत्पादक शेतकऱ्यांना निधी द्या. तेलंगणात तिथल्या काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमाफी केली आहे. या राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जातून मुक्त करता येईल का, सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात सुरू आहे. याबाबत मु्ख्यमंत्र्यांना बांबू घालायचा असेल तर तो आम्ही विधानसभेत घालू असंही संजय राऊतांनी म्हटलं. 
 

Web Title: MP Sanjay Raut criticizes Narendra Modi, BJP and Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.