मोदी-पवार भेट; राऊतांचे थेट भाष्य, म्हणाले, “महाराष्ट्राच्या भावना तुडवायचा प्रयत्न...”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2023 12:10 PM2023-08-02T12:10:37+5:302023-08-02T12:11:33+5:30
Sanjay Raut on PM Modi-Sharad Pawar Meet: लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्याला जाण्याच्या शरद पवारांच्या निर्णयावर ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
Sanjay Raut on PM Modi-Sharad Pawar Meet: लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित होते. या सोहळ्याला जाऊ नये, असे आवाहन महाविकास आघाडीतर्फे शरद पवारांना करण्यात आले होते. मात्र, तरीही ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले. शिवसेना ठाकरे गटाने यावरून नाराजीही व्यक्त केली होती. यातच आता संजय राऊत यांनी मोदी-पवार भेटीवर थेट शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ज्या पद्धतीने पक्ष फोडले, ज्या पद्धतीने गलिच्छ राजकारण केले, हा महाराष्ट्रावर झालेला अन्याय आहे. जनतेच्या मनात याविषयी रोष आहे. मोदी व्यासपीठावर होते. पण लोक रस्त्यावर उतरले. लोकांच्या मनातील खदखद कायम आहे, असे संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
महाराष्ट्राच्या भावना तुडवायचा प्रयत्न...
शरद पवार आणि मोदींच्या कार्यक्रमाविषयी वाद निर्माण झाले आहेत. पण आम्ही त्यावर पडदा टाकू. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर संकट आले, महाराष्ट्राच्या भावना तुडवण्याचा प्रयत्न झाला, महाराष्ट्राला कमजोर आणि अपमानित करण्याचा प्रयत्न झाला, जेव्हा जेव्हा दिल्लीच्या शत्रूंनी रात्रीच्या अंधारात महाराष्ट्रावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा महाराष्ट्रात सर्जिकल स्ट्राइक केला. हे पवार साहेबांचे म्हणणे अगदी बरोबर आहे. त्यामुळे पुढल्या सर्जिकल स्ट्राइकसाठी शरद पवार आमच्यासोबत नक्कीच राहतील, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मणिपूरमधील हिंसाचारावरून विरोधक मोदी सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच हरियाणात हिंसाचार उफाळला आहे. याबाबत संजय राऊतांना प्रश्न विचारण्यात आला. निवडणूक आल्यामुळे प्रत्येक राज्यात पेटवा-पेटवी सुरू होईल. प्रत्येक राज्यात अशा दंगलींना सामोरे जावे लागेल. निवडणुका जवळ आल्यावर भाजपाकडून खेळली जाणारी ही जुनी नीती आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला.