Maharashtra Politics: “एकनाथ शिंदेंनी स्वतःचा पक्ष काढून ५ आमदार निवडून आणून दाखवावेत”; संजय राऊतांचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 01:55 PM2023-03-25T13:55:41+5:302023-03-25T14:00:21+5:30
Maharashtra News: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेमुळे उद्धव ठाकरेंचे नेतृत्त्व किती मोठे आहे ते समजते, असे संजय राऊत म्हणाले.
Maharashtra Politics: आताच्या घडीला राज्यासह देशात अनेकविध मुद्द्यांवरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता होत आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, आम्हाला खोके, मिंधे का म्हणता? अशी विचारणा केली होती. याला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना चोरली आहे. त्यांनी स्वतः पक्ष स्थापन करून त्याचे पाच आमदार निवडून दाखवा. एकनाथ शिंदे, राज ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरेंवर टीका केल्याशिवाय शांत बसू शकत नाहीत. त्यामुळेच उद्धव ठाकरेंचे नेतृत्त्व किती मोठे आहे हे समजते. निवडणूक आयोगाशी सौदा करून एकनाथ शिंदे यांनी पक्ष आणि चिन्ह मिळवले, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा
विरोधक नष्ट करायचे हेच चालले आहे. एकनाथ शिंदे विधानसभेत म्हणाले की आम्हाला खोके, मिंधे का म्हणता? हा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकांना सामोरे जा. हिंमत असेल तर आणि तुम्ही सच्चे असाल किंवा जे काही बंड वगैरे केले म्हणत असाल ते खरे असेल तर राजीनामे द्या. आत्ता निवडणुका घ्या तेव्हा जनताच दाखवून देईल की, खरी शिवसेना कोणती आणि तर राजीनामे देऊन निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हान संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
दरम्यान, राहुल गांधी झुकले नाहीत. गुडघे टेकले नाहीत. राहुल गांधी यांनी माफी मागितली असती तर त्यांची खासदारकी गेली नसती. पण राहुल गांधींनी कारवाई होऊ दिली. राहुल गांधी यांनी हे पाऊल उचलणे म्हणजे हुकूमशाहीच्या विरोधात घेतलेली भूमिका आहे. आम्ही त्यांचे स्वागत करतो. राहुल गांधी यांना धडा शिकवायचा, त्यांना संसदेत बोलू द्यायचे नाही म्हणून हा घाईने घेतला निर्णय आहे. कारण अशा प्रकारच्या खटल्यांमध्ये शिक्षा होत नाही. माझ्यावर अशा प्रकारच्या सतरा केसेस आहेत. राहुल गांधी यांना जाणीवपूर्णक त्रास दिला जातो आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"