“कुणी कितीही ठरवले तरी ठाकरे हे ठाकरे आहेत, ब्रँड मिटवता येणार नाही”; संजय राऊतांचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 14:51 IST2025-02-25T14:49:09+5:302025-02-25T14:51:12+5:30
Sanjay Raut News: एकनाथ शिंदेंचे गुन्हे अनेकदा उद्धव ठाकरेंनी पोटात घातले. बाळासाहेबांनी यांना भरभरून दिले, असे सांगत संजय राऊतांनी टीका केली.

“कुणी कितीही ठरवले तरी ठाकरे हे ठाकरे आहेत, ब्रँड मिटवता येणार नाही”; संजय राऊतांचा एल्गार
Sanjay Raut News: समर्थ रामदास स्वामींनी मूर्खांची जी दहा लक्षणे सांगितली आहेत, ती सर्व लक्षणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या लोकांमध्ये दिसतात. एकनाथ शिंदे यांचे गुन्हे अनेकदा उद्धव ठाकरेंनी पोटात घातले. बाळासाहेबांनी यांना भरभरून दिले आहे. कुणी कितीही उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहेत. ज्यांनी शिवसेनेचे तुकडे केले, पक्ष विकत घेतला आणि शिंदेच्या हातात सोपविला, अशा प्रवृत्तींशी कोणत्याही प्रकारे कोणत्याही संबंध ठेवू नये हात मिळविणे करू नये अशी आमची भूमिका आहे, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अमित शाह आणि मोदी यांनी ठरवले आहे की, महाराष्ट्रातून ठाकरे ब्रँड हा संपवायचा. अमित शाह यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी एकनाथ शिंदे आणि त्यांचे चाळीस चोरांचा पक्ष स्थापन झाला. महाराष्ट्राच्या शत्रूशी कुणीही हात मिळविणी करू नये हेच आमचे मत आहे. अशा प्रकारे हात मिळविणी करणे ही महाराष्ट्राच्या हुतात्म्यांशी बेईमानी करणे असे आमचे मत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंदच होतो
मुंबईतील अंधेरी परिसरात एका विवाह सोहळ्यादरम्यान राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंची भेट झाली. तसेच त्यांनी एकमेकांशी औपचारिक संवाद साधला. यावेळी रश्मी ठाकरे याही उपस्थित होत्या. मागच्या तीन महिन्यात कौटुंबिक कार्यक्रमांच्या निमित्ताने झालेली ही तिसरी भेट आहे. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंदच होतो. अशा त्यांच्या भेटी वारंवार घडाव्यात आणि लोकांच्या मनातील संभ्रम दूर व्हावा. यातून सकारात्मक ऊर्जा बाहेर येते.
दरम्यान, दोन तारखेला शिवसेनेचे सर्व प्रमुख नेते ठाण्याचा दौरा करतील. शिवसैनिकांचे प्रश्न समजून घ्यावे पदाधिकाऱ्यांशी चर्चा कराव्या यासाठीच हा दौरा असणार आहे. पालघर ,कोकण ठाणे या ठिकाणी आम्ही जाणार आहोत. पूर्वी विभागीय शिबिर शिवसेनेची होत होती. त्याची सुरुवात आम्ही मुंबईपासून करत आहोत. नऊ मार्च रोजी ईशान्य मुंबईचा विभागीय मेळावा आम्ही कालिदास सभागृहात घेऊ. दिवसभराची ही शिबिर असतील मराठ्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये अशी शिबिर करण्याची योजना आहे, अशी माहिती संजय राऊतांनी दिली.