शिंदेची शिवसेना हे हास्यास्पद, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा विनोद; संजय राऊत संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 08:19 PM2023-02-17T20:19:42+5:302023-02-17T20:20:17+5:30

बाजारबुणग्यांनी न्याय विकत घेतला, चोरला पण तराजू कसा विकत घेणार? शिंदेंनी राजकारणात कोणता विचार आणला? चोरांचे सरदार हे चोरांना साजेसे भूमिका घेतात असा टोला संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.

MP Sanjay Raut strongly criticized Eknath Shinde and BJP | शिंदेची शिवसेना हे हास्यास्पद, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा विनोद; संजय राऊत संतापले

शिंदेची शिवसेना हे हास्यास्पद, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा विनोद; संजय राऊत संतापले

googlenewsNext

मुंबई - शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची दुसरी कुणाची शिवसेना होऊच शकत नाही. बाळासाहेबांचा विचार आक्रमक आहे. या निकालानं नक्कीच संताप आहे, वेदना आहे परंतु धक्कादायक नाही कारण हे अपेक्षित होते. अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे उमेदवार उभा केला नाही तरी चिन्ह गोठवले. ज्यांना जायचं असेल ते जातील. ज्यांच्या रक्तात, नसानसात लाचारी आहे ते मालक बदलत असतात. विचारांची शिवसेना त्याचे नेतृत्व उद्धव ठाकरेच करतील असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, हे सर्व करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल. हा देश सीरिया, इराण नाही. या देशाला फारमोठी परंपरा संस्कार आहेत. हुकुमशाहाचा अंत अत्यंत वाईट असतो. शिवसेनेच्या प्रवासाची ही सुरुवात आहे. धनुष्यबाण हे आमच्या रामानं आम्हाला दिले आहे. धनुष्यबाण आम्ही कधीच सोडणार नाही. हातात मशाल राहील. धनुष्यबाण ज्यांनी हातात घेतले ते त्यांना पेलवणार आहे का? हे बाजारबुणगे जल्लोष करतायेत. लुटीचा माल आल्यावर जल्लोष करणाऱ्यांचे राज्य खालसा होईल. भाजपाने त्यांचे अतोनात नुकसान केले आहे. काळाकुट्ट अध्याय निवडणूक आयोगाने लिहिलाय. केंद्रीय निवडणूक आयोगावर यापुढे कुणीही विश्वास ठेवणार नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच बाजारबुणग्यांनी न्याय विकत घेतला, चोरला पण तराजू कसा विकत घेणार? शिंदेंनी राजकारणात कोणता विचार आणला? चोरांचे सरदार हे चोरांना साजेसे भूमिका घेतात. ५० वर्ष आम्ही रक्ताचे पाणी करून चिन्ह घराघरात पोहचवले. अशाप्रकारे ४ लोक ठरवतात आणि निकाल देतात. या राज्याची जनता स्वस्थ बसणार नाही. भाजपाच्या अंताची सुरुवात झाली आहे. शिंदे गटाच्या अंताची सुरुवात झालीय. सगळ्या लोकशाहीतील संस्था टाचेखाली घेऊन निर्णय घेतले जातायेत हे फारकाळ चालणार नाही. हुकुमशहा आले आणि गेले अशा शब्दात राऊतांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 

भाजपाच्या अंताची सुरुवात झालीय
निकालाचे स्क्रिप्ट ३ महिन्यांपूर्वीच तयार होते. निकाल आमच्या बाजूने लागणार, चिन्ह आम्हाला मिळणार या स्क्रिप्टचं ड्राप्टिंग कुणी केले याचे उत्तर द्या. महाराष्ट्रातील जनता तुमचा मृत्यूलेख तयार करायला आज सुरूवात केली आहे. फडणवीसांची वकिली चालणार नाही. हा मुद्दा भावनिक आहे. बाळासाहेबांची शिवसेना तुमची बाजारबुणग्यांच्या हाती देता. शिवसेना फोडता. हे सगळे स्क्रिप्ट तयारच होते. चोरांनी शिरजोरी करण्याचा हा प्रयत्न आहे. निवडणुका होऊ द्या खरी शिवसेना कुणाची ते कळेल. महाराष्ट्रातल्या राजकारणात सगळ्यात मोठा विनोद म्हणजे शिंदेंचीच शिवसेना. हे सगळे हास्यास्पद आहे. पक्ष विकत घ्यायला लागल्या. दादागिरी सुरू राहिली तर लोकांना रस्त्यावर उतरावं लागेल असंही संजय राऊत म्हणाले. 

आनंद दिघे म्हणजे शिवसेना नाही, विचार नाही
आनंद दिघे शिवसेनेत जिल्हाप्रमुख होते, त्यांना बाळासाहेबांनी पद दिले, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख होते. तुम्ही त्यांचा बाळासाहेबांच्या बरोबरीचा फोटो लावता, पंतप्रधान मोदींच्या बरोबरीचा फोटो लावता हे सगळे ठरवून चालले आहे. जसे आम्ही पक्षाचे पदाधिकारी होतो तसे ते होते. ते म्हणजे शिवसेना नाही, ते म्हणजे विचार नाही. विचार बाळासाहेबांचाच, आणि हा विचार महाराष्ट्राने ठाकरेंचा विचार म्हणून स्वीकारलाय. बाळासाहेबांच्या हयातीत उद्धव ठाकरे नेतृत्व करतील हे आम्ही सगळ्यांना ठरवलेले आहे. तुम्ही कोण ठरवणार शिवसेना कुणाची? असा सवाल त्यांनी विचारला. 
 

Web Title: MP Sanjay Raut strongly criticized Eknath Shinde and BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.