"देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य..."; खा. संजय राऊतांचा खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 01:49 PM2023-02-14T13:49:37+5:302023-02-14T13:50:01+5:30

महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिमेला तडे जातील अशाप्रकारे खोटी विधाने कितीही केली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही असं संजय राऊतांनी म्हटलं.

MP Sanjay Raut targeted BJP along with Devendra Fadnavis | "देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य..."; खा. संजय राऊतांचा खोचक टोला

"देवेंद्र फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य..."; खा. संजय राऊतांचा खोचक टोला

Next

नवी दिल्ली - शरद पवारांशी बोलून जर पहाटेचा शपथविधी झाला असता तर नक्कीच ते सरकार चालले असते. सरकार ७२ तासांत कोसळले नसते. देवेंद्र फडणवीसांबद्दल काय बोलू? अलीकडे त्यांची वक्तव्ये पाहतोय. फडणवीस हे जगातील दहावं आश्चर्य आहे. आधी ८ आश्चर्य आहेत. २ आश्चर्य दिल्लीत बसलेत अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. 

संजय राऊत म्हणाले की, माणसाने किती खोटे बोलावे. मूळात तुम्ही विश्वासघात केल्यामुळे अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद देण्याचं भाष्य केले होते. अमित शाह यांच्यासमोर सत्तेचे वाटप ५०-५० टक्के झाले होते. विश्वासघात त्यांनी केल्यामुळे आता गळा काढण्यात काय अर्थ आहे? पहाटेच्या शपथविधीतून देवेंद्र फडणवीस बाहेर पडले नाहीत. सहा महिन्यांपूर्वी जो ४० आमदार बाहेर पडून सूरत-गुवाहाटीमार्गे परतले आणि त्यानंतर शपथविधी झाला तो शरद पवारांमुळेच झाला असंही सांगू शकतात असंही त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत एका वैफल्यातून ते बोलतायेत. महाराष्ट्रात त्यांच्या सरकारविषयी अत्यंत तिरस्कार आणि घृणा आहे. नागपूर-विदर्भात ते हरलेत. विधान परिषद निवडणुकीत पराभव झाला. कसबा, चिंचवड विधानसभेत त्यांचा पराभव दिसत आहे. त्यातून लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशी विधाने करत आहेत असं सांगत राऊतांनी फडणवीसांवर शरसंधान साधले. 

दरम्यान, अजित पवार हे ठामपणे, मजबुतीने महाराष्ट्रात एक वातावरण निर्मिती करत आहेत. भाजपाविरोधात लढा देतायेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिमेला तडे जातील अशाप्रकारे खोटी विधाने कितीही केली तरी लोकांचा विश्वास बसणार नाही. पहाटेचा शपथविधीने अजूनही फडणवीसांना दचकून जाग येते. त्यावर फडणवीसांनी उपचार करायला हवेत. राज्यातील वातावरण मिंदे-फडणवीसांविरोधात आहे. त्याचा परिणाम असल्याने अशी विधान देवेंद्र फडणवीस करत आहेत असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. 
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?
“२०१९ मध्ये आम्ही सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली होती. या सरकार संदर्भात सर्व चर्चा झाल्या होत्या. पण, ऐनवेळेला आमच्यासोबत विश्वासघात करण्यात झाला. पहिला विश्वासघात उद्धव ठाकरे यांनी केला आणि दुसरा विश्वासघात पवारांनी केला,” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. 
 

Web Title: MP Sanjay Raut targeted BJP along with Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.