“ठाकरे गटाच्या १५ उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर करणार”; संजय राऊतांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 12:39 PM2024-03-25T12:39:20+5:302024-03-25T12:40:19+5:30

Sanjay Raut News: वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले नाहीत, तरी आम्ही जिंकू. आम्ही परावलंबी नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.

mp sanjay raut told shiv sena thackeray group will declared first list of 15 to 16 candidates tomorrow for maharashtra lok sabha election 2024 | “ठाकरे गटाच्या १५ उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर करणार”; संजय राऊतांची माहिती

“ठाकरे गटाच्या १५ उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर करणार”; संजय राऊतांची माहिती

Sanjay Raut News: महाविकास आघाडीला त्यांच्या चार जागा परत करतो. त्याच्यावर त्यांनी लढावे. आम्हाला चार जागा दिल्याचा प्रस्ताव त्यांनी दिला. मात्र प्रत्यक्षात आम्हाला अकोला आणि उर्वरित दोन जागा ऑफर केल्या. त्यामुळे त्यांनी खोटे बोलणे थांबवावे, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट शब्दांत सांगितल्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची पहिली उमेदवारी यादी उद्या जाहीर करणार आहोत. या पहिल्या यादीत १५ ते १६ उमेदवारांची घोषणा करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचे मोठे नेते आहेत. ते आमच्यासोबत असावेत, अशी आमची नेहमीच इच्छा असते. आमचे प्रयत्न कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असतील. मात्र, आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला होता. आता तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही, हे त्यांच्या हातात आहे. महाविकास आघाडीत चार ते पाच पक्ष सामील आहेत. त्यांना त्यांचा वाटा मिळायला हवा, असे संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले. 

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले नाहीत, तरी आम्ही जिंकू

वंचित बहुजन आघाडीला आम्ही दिलेला चार जागांचा प्रस्ताव चांगला आहे. ज्या जागा त्यांनी मागितल्या होत्या, त्या जागा आम्ही त्यांना दिल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत आले नाहीत, तरी आम्ही जिंकू. महाविकास आघाडीच्या मागे जनमत आणि लोकमत आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत असते, तर हा विजय आणखी दैदिप्यमान झाला असता. मताधिक्य वाढले असते. परंतु, याचा अर्थ असा नाही की, आम्ही परावलंबी आहोत, असे संजय राऊतांनी ठणकावून सांगितले. 

दरम्यान, प्रकाश आंबेडकर सन्माननीय नेते आहेत. आम्ही त्यांच्याशी वारंवार चर्चा केली. आम्ही त्यांना वारंवार विनंती केली आहे. त्यांनी हा प्रस्ताव मान्य करायला हवा होता. पण तरीही आम्ही आशा सोडलेली नाही, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. 
 

Web Title: mp sanjay raut told shiv sena thackeray group will declared first list of 15 to 16 candidates tomorrow for maharashtra lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.