मराठा आरक्षणाच्या बैठकीचं निमंत्रण न मिळाल्यानं राऊत भडकले; भाजप आमदारानं जखमेवर मीठ चोळले!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2023 10:52 AM2023-11-01T10:52:02+5:302023-11-01T10:52:50+5:30
"मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही," असे म्हणत खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला होता.
सध्या संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. राज्यात ठीक-ठिकाणी तीव्र आंदोलन सुरू आहे. यामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अनेक ठिकाणी तर लोकप्रतिनिधींच्या घरांना आणि कार्यालयांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. यासंदर्भात, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट करत, "मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही," असे म्हणत सरकारवर निशाणा साधला होता. यानंतर, आता हाच धागा धरत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांच्या जखमेवर मिठ चोळत टोमणा लगावला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत -
राऊत यांनी ट्विट करत म्हटले होते, "या सरकारचे करायचे काय?महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही. शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना आमंत्रण. एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले. पण शिवसेना यांच्या डोळ्यात खुपते. अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले. ठीक. आम्हाला मानपान नको. पण प्रश्न सोडवा. जरंगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशोबाचे वेळ जवळ येत आहे. जय महाराष्ट्र!"
या सरकारचे करायचे काय?
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 31, 2023
महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली.त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही.
शिवसेनेचे 16 आमदार व 6 खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे.
एक आमदार असलेल्यांना आमंत्रण.एकही… pic.twitter.com/kQ0jdDtdCf
भतखळ करांचा टोमणा -
राऊतांच्या सरकारवरील या टीकेनंतर, भाजप नेते तथा आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना टोमणा लगावला आहे. "फडणवीस सरकारने दिलेले मराठा आरक्षण ज्यांच्यामुळे गेले त्यांना मराठा आरक्षणाच्या बैठकीला कशासाठी बोलवायचे? असा तर्कसंगत विचार शिंदे फडणवीस सरकारने केला असावा..." असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
काय करायचे ते करा, पण...; जरांगेंचा अल्टिमेटम -
काल मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांसंदर्भात बोलताना जरांगे यांनी म्हटले होते की, "शासनाने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. शासनाने काय करायचे ते करावे. बुधवारी रात्रीपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आज रात्रीपासून पाणी पिणे बंद करणार असून, होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार असेल."