चिखलोली रेल्वे स्थानकाची भूसंपादनाची प्रक्रिया लवकर पूर्ण करण्याच्या खासदार शिंदे यांच्या सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 08:52 PM2021-09-06T20:52:31+5:302021-09-06T20:55:11+5:30
अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये चिखलोली रेल्वे स्थानक प्रस्तावित असून या स्थानकासाठी भूसंपादन लवकरात लवकर करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
अंबरनाथ:अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये चिखलोली रेल्वे स्थानक प्रस्तावित असून या स्थानकासाठी भूसंपादन लवकरात लवकर करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना स्थानकासाठी लागणारी जागा लवकरात लवकर ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या. अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्यावर चिखलोली स्थानकाचे प्रत्येक वेळेस चर्चा करण्यात येते. मात्र प्रत्यक्षात या स्थानकासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया आता पुढे सरकली आहे.
रेल्वे स्थानकासाठी लागणारी जागा अधिकृतपणे भूसंपादन करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीकडे अधिकार प्राप्त करून देण्यात आले आहेत. त्यासंदर्भात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांच्यावतीने एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत चिखलोली स्थानकासाठी लागणारी जागा संपादित करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीने योग्य ते सहकार्य करावे आणि लवकरात लवकर भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण कराव्यात अशा सूचना खासदार शिंदे यांनी दिले. केवळ रेल्वेस्थानकासाठी जागा संपादित करून चालणार नसून रेल्वेस्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या रस्त्यासाठी देखील जागा ताब्यात घेण्याची गरज या वेळी व्यक्त करण्यात आली. गेल्या वीस वर्षांपासून चिखलोली रेल्वे स्थानकाची चर्चा अनेक वेळा करण्यात आली. एवढेच नव्हे तर चिखलोली रेल्वे स्थानकाचे गाजर दाखवत अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या सदनिकांची विक्री देखील केली होती.
मात्र गेल्या वीस वर्षात चिखलोली स्थानकाबाबत कोणताही कागद पुढे सरकला नव्हता. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. ही भूसंपादनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना खासदार यांनी दिले आहेत.