महाराष्ट्रात मंत्रालयाकडचं झाड हलवलं तर, भ्रष्ट्राचाराची शंभर प्रकरणं बाहेर पडतील; राऊतांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 11:22 AM2023-02-27T11:22:15+5:302023-02-27T11:23:08+5:30
महाराष्ट्रात सध्याच्या मुख्यमंत्र्यांसह ४० आमदार फुटून गेलेत त्यांच्यावर काय आरोप आहेत पाहा, राऊतांचं वक्तव्य.
“देशातलं वातावरण दिवसेंदिवस आणीबाणीपेक्षाही भयानक होताना दिसतंय. राजकीय विरोधकांना निरनिराळ्या प्रकरणांमध्ये गुंतवून अटक करणे, जामीन न मिळणे यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर बेफामपणे सुरू आहे. दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, झारखंड सारख्या राज्यांमध्ये हे सुरू आहे. निवडणुका जवळ येईल तसं हे वाढत जाईल. सिसोदिया हे दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत, शिक्षणमंत्री म्हणून जगाला हेवा वाटेल असं काम त्यांनी केलंय. त्यांनी घेतलेला निर्णय असे निर्णय हे कॅबिनेटचे आहेत. खोटे आरोप, मोठ्यानं ओरडण्यासाठी त्यांच्या यंत्रणा आहेत. लोकशाही रोज खड्ड्यात जाताना दिसतेय. केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली तेव्हाही यावर चर्चा झाली,” असं संजय राऊत म्हणाले. माध्यमांशी संवाद साधताना राऊतांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
“केंद्राला माझं एक आव्हान आहे तुमच्या पक्षात संत आणि महात्मेच आहेत. रोज तुमची शंभर प्रकरणं बाहेर येत आहेत. महाराष्ट्रात मंत्रालयाकडचं झाड हलवलं तर भ्रष्ट्राचाराची शंभर प्रकरणं बाहेर पडतील. एलआयसीचे पैसे बुडवण्यात आले. पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक कोणी बुडवली, त्यांना साधी नोटीस पाठवली नाही. देशात आयएनएस विक्रांत वाचवण्याच्या नावानं घोटाळा झाला, काय झालं? चौकशी सुरू करताच क्लिन चीट मिळाली,” असं राऊत म्हणाले.
“२०२४ ला कोणाचं सरकार येईल हे सांगता येत नाही. ते याच पद्धतीनं तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला लागले तर तुम्हाला कोण वाचवणार. तुम्ही जो पायंडा पाडलाय तो अत्यंत घातक पायंडा आहे. या देशात असं कधी घडत नव्हतं. गेल्या सात वर्षांत आपल्या बाजूच्यांना निर्मला वॉशिंग मशीनमध्ये टाकायचं आणि स्वच्छ करून बाजूला ठेवायचं काम सुरु आहे. महाराष्ट्रात सध्याच्या मुख्यमंत्र्यांसह ४० आमदार फुटून गेलेत त्यांच्यावर काय आरोप आहेत पाहा. आशिष शेलारांनी नगरविकास खात्यासंदर्भात याचिका केलीये ती वाचा. त्या खात्यानं केलेले भ्रष्टाचार काय आहेत? ती प्रकरणं दिसत नाहीत. फक्त विरोधकांची प्रकरणं दिसतायत हे अत्यंत गंभीर आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.