"...तर मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार", खासदार श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले
By यदू जोशी | Published: June 9, 2023 07:32 PM2023-06-09T19:32:38+5:302023-06-09T19:33:02+5:30
शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.
२०२४ साली मा. नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा या देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील तमाम जनतेचा निर्धार आहे. त्यासाठी आम्ही प्राणपणाने प्रयत्न करू. परंतु, काही शुल्लक कारणांसाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांकडून सुरू असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. येत्या लोकसभेच्या निवडणूकीत कुणाला उमेदवारी द्यायची हा निर्णय शिवसेना-भाजप युतीचे वरिष्ठ नेते घेतील. मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल त्याचा एकदिलाने आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू, असे शिंदे यांनी नमूद केले.
"केंद्रात पुन्हा भाजप- शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदुखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे", असेही श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.