हीच विरोधकांची पोटदुखी; खासदार श्रीकांत शिंदेंनी लगावला उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 12:21 PM2022-10-24T12:21:40+5:302022-10-24T12:22:03+5:30
शिवसेना-भाजपा सरकार लोकांच्या मनात होते. त्याला लोकांनी परवानगी दिली आहे. महाराष्ट्राला इतिहास, परंपरा आहे ती जपायला हवी. गेली २ वर्ष सण साजरे केले गेले नाहीत. आजही तेच करायची इच्छा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ठाणे - गेल्या ३ महिन्यात सरकार लोकहिताचे, कष्टकऱ्यांचे निर्णय घेत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात जीआर काढले गेले. अडीच वर्षात जी गाडी थांबली होती ती सुसाट नेण्याचं काम मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जात आहे. दिवसरात्र हे सरकार काम कसं करू शकतं?, वर्षाची दारे सर्वसामान्यांसाठी खुली कशी? हीच पोटदुखी विरोधकांना आहे. त्यामुळे केवळ टीका करण्याचं काम विरोधकांकडे उरलं आहे अशा शब्दात खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
खा. श्रीकांत शिंदे म्हणाले की, आज सर्वसामान्य माणूस वर्षापर्यंत पोहचतोय. आम्ही आमच्या कामातून उत्तर देतोय. विरोधकांनी टीका करत राहावी आणि आम्ही काम करत राहू असं मुख्यमंत्री म्हणतात. म्हणूनच ही तरूणाई एकनाथ शिंदेंच्या पाठिशी ठाम उभी आहे. तरुणाई ज्यारितीने मुख्यमंत्र्यांना भेटतेय. हे सरकार आलेले आहे ते प्रत्येकाच्या मनात होते. विरोधकांनी जनतेचा प्रतिसाद पाहूनतरी डोळे उघडावेत असं त्यांनी सांगितले.
तसेच शिवसेना-भाजपा सरकार लोकांच्या मनात होते. त्याला लोकांनी परवानगी दिली आहे. महाराष्ट्राला इतिहास, परंपरा आहे ती जपायला हवी. गेली २ वर्ष सण साजरे केले गेले नाहीत. आजही तेच करायची इच्छा आहे का? आज सगळे उत्साहात बाहेर पडले आहेत. निर्बंधमुक्त वातावरणात लोक उत्सव साजरे करत आहेत. विरोधकांना जे काही बोलायचं ते बोलून द्या. लोक सरकारच्या मागे ठामपणे उभे आहेत. आम्ही काम करत राहू त्यांना बोलू द्या असं सांगत श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना टोला लगावला.
दरम्यान, दिवाळीचा पहिला दिवस असल्याने तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित राहिली आहे. राम मारुती रोड, तलावपाळी याठिकाणी मुख्यमंत्री भेटी देत आहेत. सगळे सण आपण साजरे करतोय. निर्बंधमुक्त वातावरणात लोक सण साजरे करतात. विरोधकांना टीका करायचं काम ठेवले आहे ते दुसरं काय करणार असंही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"