महायुतीच्या चर्चेला पुन्हा उधाण! खासदार श्रीकांत शिंदेंची मनसे कार्यालयाला भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 11:05 AM2022-10-24T11:05:02+5:302022-10-24T11:05:39+5:30

या भेटीमुळे भविष्यात महायुतीची नांदी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. कारण मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हेदेखील याच मतदारसंघातील आहेत.

MP Shrikant Shinde visited MNS office in Dombivli | महायुतीच्या चर्चेला पुन्हा उधाण! खासदार श्रीकांत शिंदेंची मनसे कार्यालयाला भेट

महायुतीच्या चर्चेला पुन्हा उधाण! खासदार श्रीकांत शिंदेंची मनसे कार्यालयाला भेट

Next

डोंबिवली - भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना आणि मनसे या तीन पक्षाच्या महायुतीची चर्चा पुन्हा जोर धरू लागली आहे. राज्यात सत्तांतर झाल्यापासून राज ठाकरे यांच्या मनसेचं महत्त्व वाढलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेकांनी शिवतीर्थवर भेट देत राज ठाकरेंशी जवळीक वाढवली आहे. भाजपा-मनसे-शिंदे गट हे तिन्ही पक्ष आगामी निवडणुकीत एकत्र दिसणार का? अशी चर्चा आहे. 

त्यातच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे भविष्यात महायुतीची नांदी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. कारण मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हेदेखील याच मतदारसंघातील आहेत. त्यात भाजपा-मनसे-शिंदे गट युती होण्यास हरकत काय असं सांगत राजू पाटलांनी युतीत काही गैर नाही असं म्हटलं होते. त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी मनसे कार्यालयाला भेट दिली. त्यामुळे राजू पाटील आणि श्रीकांत शिंदे यांच्यात आपुलकी निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. 

शिंदे-फडणवीस-ठाकरे एकत्र?
महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जवळीक वाढल्याचं अनेक घटनांमध्ये दिसून येत आहे. यातच, मनसेकडून शिवाजी पार्कवर करण्यात आलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात हे तीनही नेते एकत्र आल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. यावेळी मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. राज यांच्याकडून मुंख्यमंत्र्यांचा सत्कारही करण्यात आला. यानंतर मैदानावर फटाक्यांची जबरदस्त आतशबाजीही बघायला मिळाली होती. 

राजकारणात काहीही शक्य - महाजन
राजकारणात काहीही अशक्य नसते असं सांगत भाजप नेते तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महायुतीचे संकेत दिले होते. सध्या तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा एकत्र आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील असं गिरीश महाजन म्हणाले होते. त्यामुळे भविष्यात भाजपा-मनसे-शिंदे गट अशी महायुती पाहायला मिळणार का हे येणाऱ्या काळात समजेल. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: MP Shrikant Shinde visited MNS office in Dombivli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.