'एमपीएससी'कडून कोरोना पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याबाबतची नियमावली जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 05:53 PM2020-09-16T17:53:17+5:302020-09-16T17:53:46+5:30

उमेदवारांना या नियमावलीचे काटेकोर पालन करणे असणार बंधनकारक..

MPSC announces rules regarding health of candidates | 'एमपीएससी'कडून कोरोना पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याबाबतची नियमावली जाहीर

'एमपीएससी'कडून कोरोना पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याबाबतची नियमावली जाहीर

Next
ठळक मुद्देउमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संकेतस्थळावर नियमावली जाहीर

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संकेतस्थळावर नियमावली जाहीर केली आहे. उमेदवारांनी या नियमावलीचे काटेकोर पालन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 
   परीक्षा उपकेंद्रामध्ये प्रवेश करतांना उमेदवाराने किमान तीन पदरी कापडाचा मुखपट (मास्क) परिधान करणे सक्तीचे आहे. परीक्षा कक्षामध्ये मुखपट, हातमोजे व सनिटाईझरची लहान पिशवी असलेले प्रत्येकी एक किट उमेदवारांना देण्यात येणार आहे. त्याचा वापर उमेदवारांनी दोन्ही सत्राकरीता (असल्यास) करणे अनिवार्य आहे. परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान उमेदवारांनी हात सतत सनिटाईझ करणे आवश्यक आहे. कोव्हिड-१९ सदृश्य लक्षणे जसे की ताप, सर्दी, खोकला आदी लक्षणे दिसून येत असल्यास संबंधित परीक्षा उपकेंद्रावरील पर्यवेक्षकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना याची पूर्वकल्पना द्यावी. उमेदवारांनी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे. उमेदवाराने स्वत:चा जेवणाचा डबा किंवा अल्पोपहार व पाण्याची बाटली सोबत आणावी. दोन पेपरच्या मधल्या वेळामध्ये उमेदवारांना परीक्षा उपकेंद्राच्या बाहेर जाण्यास मनाई आहे. परीक्षा कक्षात एकमेकांचे पेन, लिखाण साहित्य आदी वापरण्यास उमेदवारांना सक्ती आहे.  परीक्षा उपकेंद्रावरील सूचनांचे सर्व उमेदवारांनी काटेकोर पालन करावे. 
    प्रतिबंधित क्षेत्रामधील परीक्षा उपकेंद्रावरील उमेदवारांची बैठक व्यवस्था ऐनवेळी इतर परीक्षा उपकेंद्रावर करण्यात आल्यास तसे आयोगाच्या संकेतस्थळावर सूचना प्रसिध्द करण्यात येईल. तसेच संबंधित उमेदवाराला त्याच्या आयोगाकडील नोंदणी क्रमांकावर एसएमएस द्वारे कळविले जाईल. परीक्षा संपल्यानंतर परीक्षा उपकेंद्राबाहेर जाताना शारिरीक अंतर राखणे उमेदवारांना अनिवार्य आहे. वापरलेले टिश्यु पेपर, मुखपट, हातमोजे, सनिटाईझ पाऊच, आदी वस्तू परीक्षा उपकेंद्रावरील कचरापेटीतच टाकावेत. कोव्हिड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने केंद्र व राज्य शासन तसेच स्थानिक प्राधिकरणाकडून वेळोवळी जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन एमपीएससीने केले आहे. 

Web Title: MPSC announces rules regarding health of candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.