'आता जोमाने तयारीला लागा, तुम्हाला उत्तम यश लाभेल'; MPSC च्या विद्यार्थ्यांना शरद पवारांच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 07:55 PM2023-02-23T19:55:56+5:302023-02-23T19:56:23+5:30
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील बदल 2025 पासून लागू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
MPSC News : मागील काही दिवसांपासून पुण्यात MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. 2025 पर्यंत राज्यसेवा मुख्य परीक्षा वर्णनात्मक न घेता एमसीक्यू पद्धतीनेच घ्यावी अशी मागणी त्यांची होती. त्यांच्या आंदोलनाला आज अखेर यश आलं आणि आयोगाने नवीन परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला. यानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची पहिलीप्रतिक्रिया समोर आली आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) February 23, 2023
विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. अनेक नेत्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही विद्यार्थ्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. शरद पवारांनी तर रात्री 11 वाजता आंदोलनास्थळाला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. एमपीएससी जोपर्यंत अधिकृतपणे नोटिफिकेशन काढणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यावर विद्यार्थी ठाम होते. आज अखेर त्यांच्या आंदोलनाला यश आले आहे.
तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!#MPSC
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 23, 2023
आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत शुभेच्छाही दिल्या आहेत. 'तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा. एमपीएससीच्या परीक्षेत तुम्हाला उत्तम यश लाभेल आणि तुम्ही राज्याच्या प्रशासकीय सेवेत भरीव योगदान भविष्यात द्याल, याचा मला विश्वास आहे. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.' असे ट्विट पवारांनी केले आहे.