भुजबळ, वडेट्टीवारांच्या विरोधानंतरही पुढे ढकलली ‘एमपीएससी’ परीक्षा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 06:29 AM2020-10-10T06:29:08+5:302020-10-10T06:43:24+5:30

MPSC Exam Postponed: लॉकडाऊनचे दिले कारण; मुख्यमंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांची होती मागणी

MPSC exam postponed even after chhagan Bhujbal vijay Wadettiwar oppose | भुजबळ, वडेट्टीवारांच्या विरोधानंतरही पुढे ढकलली ‘एमपीएससी’ परीक्षा!

भुजबळ, वडेट्टीवारांच्या विरोधानंतरही पुढे ढकलली ‘एमपीएससी’ परीक्षा!

Next

मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) येत्या रविवारी (दि.११) होणारी पूर्वपरीक्षा मराठा नेत्यांच्या दबावानंतर मागे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, परीक्षेची तयारी झालेली नाही आणि लॉकडाऊनमुळेही अडचणी आहेत. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांचीही मागणी होती, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना सांगितले.

एमपीएससीची पूर्वपरीक्षा पुढे ढकलू नये, असे आग्रही मत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि बहुजन विकास विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले होते. तर, परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी मराठा नेते गेले दोन दिवस मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करीत होते.

आज मुख्यमंत्र्यांनी काही मंत्र्यांसमवेत मराठा नेत्यांशी पुन्हा चर्चा केली व नंतर मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, जलसंपदामंत्री जयंत पाटील, ओबीसी विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार, परिवहनमंत्री अनिल परब यांची बैठक झाली आणि तीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.

संभाजीराजे-वडेट्टीवार यांच्यात शाब्दिक खडाजंगी
‘वेळ येईल तेव्हा तलवार बाहेर काढेन’ या खासदार संभाजीराजे यांच्या विधानावरून त्यांच्यात आणि बहुजन विकास विभाागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यात शुक्रवारी वाक्युद्ध रंगले. मराठा व ओबीसींमध्ये फूट पाडण्याचा काहींचा प्रयत्न आहे, पण आम्ही ते होऊ देणार नाही. संयम कधी सोडायचा, ते आम्हाला माहिती आहे. आम्ही तलवार सतत काढत नाही, वेळ आली की जरूर काढू, असा इशारा संभाजीराजे यांनी तुळजापूर येथे दिला. त्यावर ‘तलवार कोणाच्या विरोधात उपसणार’ असा उपरोधिक सवाल वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला.

दोन मंत्र्यांचा विरोधकशासाठी?
मराठा आरक्षणाबाबतचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात कधी होईल, याची कल्पना नाही. मराठा समाजातील अनेक तरुण कुणबी म्हणून ओबीसीत आले आहेत. काही खुल्या प्रवर्गातून येतात आणि परीक्षा देतात. आता परीक्षा पुढे ढकलली तर उमेदवारांच्या वयोमर्यादेचा प्रश्न येईल, बाकीही गुंतागुंत निर्माण होईल. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीचा मराठा नेत्यांनी पुनर्विचार करावा, असे आवाहन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना केले. दुसरीकडे वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आजच्या बैठकीतही परीक्षा रद्द न करण्याचा आग्रह धरला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कधी होणार पूर्वपरीक्षा?
परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाईल. लॉकडाऊनमुळे या आधीही दोनवेळा ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, यानंतर जी तारीख जाहीर होईल, त्याच तारखेला परीक्षा होईल. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

का घेतला निर्णय?
गेले चार महिने अभ्यासिका, महाविद्यालये बंद आहेत. अभ्यासाला पुरेसा अवधी मिळाला पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची सूचना होती.
सर्व समाजांच्या विद्यार्थ्यांचा विचार करून आजचा निर्णय घेतला आहे. त्यांच्यात परीक्षेबाबत संभ्रमावस्था होती. काही विद्यार्थी कोरोनाग्रस्तही आहेत, हे लक्षात घेता परीक्षा पुढे ढकलली जात आहे.
एमपीएससीशी चर्चा करून नवीन तारीख जाहीर केली जाईल. मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोवर परीक्षा होणार नाही का? या पत्रकारांच्या प्रश्नास मुख्यमंत्र्यांनी बगल दिली.

त्या सर्वांना देता येणार परीक्षा
मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले की, रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी जे विद्यार्थी पात्र होते, त्या सर्वांना पुढे जाहीर होणाºया तारखेला परीक्षा देता येईल. त्यांना वयोमर्यादा संपली म्हणून नाकारले जाणार नाही.

Web Title: MPSC exam postponed even after chhagan Bhujbal vijay Wadettiwar oppose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.