MPSC च्या 'त्या' परीक्षाही मराठीत घेण्यात येतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 19:38 IST2025-03-12T19:36:27+5:302025-03-12T19:38:57+5:30
MPSC Exam Marathi: एमपीएससी परीक्षा मराठीमध्ये घेण्यात याव्यात, यासंदर्भात विधान परिषदेमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

MPSC च्या 'त्या' परीक्षाही मराठीत घेण्यात येतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Devendra Fadnavis MPSC Exam: एमपीएससीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जातील, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
विधान परिषदेमध्ये आमदार मिलिंद नार्वेकर यांनी एमपीएससीकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा मराठी घेण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. कृषी आणि अभियांत्रिकी विद्याशाखांसंदर्भातील काही परीक्षा इंग्रजीमध्येच घेतल्या जात असल्याचे ते म्हणाले.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या परीक्षा मराठीत का घेतल्या जात नाहीत?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मूळात या ज्या परीक्षा आहेत, त्या मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये घेतो, पण न्यायालयाने आपल्याला असा एक निर्णय दिला होता की, त्यातील काही परीक्षा अशा आहेत. कृषी अभियांत्रिकीशी संबंधित ज्या परीक्षा आहे, त्या आपण मराठीत घेत नाहीत, इंग्रजीतच घेतो."
या मुद्द्यावर फडणवीस पुढे म्हणाले की, "न्यायालयासमोर हा विषय गेल्यानंतर एक बैठक झाली आणि त्या बैठकीत असा विषय आला की, याची पुस्तके काही उपलब्ध नाहीत. त्यामुळे ते न्यायालयाच्याही निदर्शनास आणून देण्यात आले. न्यायालयानेही ते मान्य केले."
मराठीमध्ये पुस्तके तयार केली जातील -फडणवीस
"आता राज्य सरकारने असा निर्णय केलेला आहे की, जरी याची पुस्तके उपलब्ध नसतील, तरीही नव्या शैक्षणिक धोरणामध्ये आपल्याला अभियांत्रिकी देखील मराठीत घेण्याची मुभा मिळालेली आहे. म्हणून जे टेक्निकल कोर्सेस ज्याची एमपीएससी परीक्षा मराठीमध्ये घेत नाहीत. कारण त्याची पुस्तेक उपलब्ध नाहीत. त्याची पुस्तके तयार करण्यात येतील. त्याचा एक कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल एमपीएससी बोलून आणि त्याही परीक्षा या मराठीमध्ये घेण्यात येतील", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.