MPSC: एमपीएससीचा निकाल जाहीर, विनायक पाटील राज्यात पहिला
By प्रशांत बिडवे | Published: January 18, 2024 11:29 PM2024-01-18T23:29:18+5:302024-01-18T23:29:37+5:30
MPSC Result: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा- २०२२ चा निकाल गुरुवारी (दि. १८) जाहीर झाला. एमपीएससी ने अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली असून विनायक नंदकुमार पाटील याने ६२२ गुण घेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
- प्रशांत बिडवे
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा मुख्य परीक्षा- २०२२ चा निकाल गुरुवारी (दि. १८) जाहीर झाला. एमपीएससी ने अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली असून विनायक नंदकुमार पाटील याने ६२२ गुण घेत मुलांमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. पूजा अरुण वंजारी हिने (५७०. २५) गुण घेत मुलींमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे.
एमपीएससी तर्फे ६२३ पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार पदांचा समावेश आहे. गुरुवारी दि.१८ रोजी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्यानंतर त्याच दिवशी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. विनायक पाटील याने पहिला, धनंजय वसंत बांगर याने (६०८) गुण घेत दुसरा तर सौरभ केशवराव गावंदे याने (६०६.७५) गुण घेत तिसरा तसेच गणेश दत्तात्रय दिघे (६०५.२५) चौथा आणि शुभम गणपती पाटील (६०३.२५) पाचवा क्रमांक मिळविला.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यंदा मुलांनी बाजी मारली असून पाहिल्या शंभर उमेदवारांमध्ये एकही महिला उमेदवाराला स्थान मिळविता आले नाही.
मुलाखतीनंतर एका तासात निकाल जाहीर
राज्य सेवा मुख्य परीक्षा-२०२२ च्या लेखी परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती नवी मुंबई, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या केंद्रांवर ३० नोव्हेंबर,२०२३ ते १८ जानेवारी, २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. मुलाखतीचा हा कार्यक्रम संपल्यानंतर एका तासाच्या अवधीत सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली.
तिसऱ्या प्रयत्नात जिल्हाधिकारी
जीवनात एक वेळ स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन पद मिळावे यासाठी लाखो विद्यार्थी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येतात. मात्र, शुभम पाटील यांना मनासारखे पद मिळविण्यासाठी तीन वेळा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागले.' मी दोनदा एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालो. विशेष म्हणजे मागच्या वेळी राज्यात दुसरा क्रमांक पटकावूनही मनासारखे पद मिळाले नाही. त्यामुळे पुन्हा तिसऱ्यांदा एमपीएससी परीक्षा दिली. यावेळी राज्यात पाचवा क्रमांक मिळविला आहे त्यामुळे अखेर यंदा माझी उपजिल्हाधिकारी पदी वर्णी लागेल अशी प्रतिक्रिया शुभम पाटील याने लोकमत ला दिली.