'एमपीएससी'ने विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटक अंतर्गत अर्ज भरण्याची संधी द्यावी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 02:49 PM2020-09-11T14:49:34+5:302020-09-11T14:51:03+5:30
एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी अनेक विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणाअंतर्गत सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून अर्ज भरला आहे.
पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी अनेक विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणाअंतर्गत सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून (एसीईबीसी) अर्ज भरला आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेमराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे एमपीएससीने विद्यार्थ्यांना आर्थिक दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस ) अंतर्गत अर्ज भरण्याची संधी द्यावी. तसेच कोरोना व इतर कारणांमुळे वारंवार परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे वय वाढले आहे. त्यामुळे राज्य शासनाने विविध परीक्षांच्या वयोमर्यादेत वाढ करावी ,अशी मागणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला बुधवारी स्थगिती दिली.तसेच घटनापीठकडे मी याबाबत पुढील सुनावणी होणार आहे. मात्र , एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी एसईबीसीतून अर्ज भरला आहे. या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे आपला अर्ज कोणत्या संवर्गासाठी गृहीत धरला जाईल, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी खुल्या संवर्गाऐवजी आम्हाला ईडब्ल्यूएस अंतर्गत अर्ज भरण्यास संधी द्यावी, अशी मागणी केली आहे.
मराठा आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ठ असल्यामुळे एमपीएससीने विविध पदांची जाहिरात प्रसिद्ध करताना न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून पद भरती केली जाईल,असा उल्लेख केला होता. त्यामुळे यापूर्वी नियुक्त झालेल्या उमेदवारांमध्ये सुध्दा काहीसे भीतीचे वातावरण आहे, असेही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी सांगत आहेत.
एमपीएससीने कोरोनासह इतर कारणामुळे परीक्षा पुढे ढकलल्या. परंतु, काही विद्यार्थ्यांनी संबंधित पदांसाठी निश्चित केलेली वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यसेवा परीक्षा, पोलीस उपनिरीक्षक परीक्षा आदी पदांच्या परीक्षेसाठी आयोगाने निश्चित केलेली वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय न घेतल्यास विद्यार्थ्यांना आत्महत्या करावी लागेल ,अशी संतप्त प्रतिक्रिया काही विद्यार्थ्यांनी दिली.
-------------------
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात असून राज्य शासनाने याबाबत केंद्र शासनावर दबाव आणणे गरजेचे आहे. तसेच यापूर्वी एसईबीसीमधून अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएसमधून अर्ज भरण्याची संधी द्यावी.
- अनुप देशमुख, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी
----------------
पूर्वी मराठा आरक्षणाचा लाभ घेऊन अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस अंतर्गत अर्ज भरण्याची संधी उपलब्ध नव्हती. आता आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे एमपीएससीने विद्यार्थ्यांच्या प्रोफाईलमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी संधी द्यावी.तसेच विविध परीक्षांची वयोमर्यादा वाढवावी.
- उमेश घोग'रे ,स्पर्धा परीक्षा विद्यार्थी