MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश; आयोगाकडून २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 12:49 PM2024-08-22T12:49:05+5:302024-08-22T12:49:41+5:30
आयोगाच्या बैठकीत २५ ऑगस्ट रोजी होणारी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
MPSC Exam Update ( Marathi News ) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर २५ ऑगस्ट रोजी होणारी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने झालेल्या कोंडीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मागील दोन दिवसांपासून आंदोलनाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनाला यश मिळालं असून आज झालेल्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला. परीक्षेची नवी तारखी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीकडून दोन परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुणे शहरात आंदोलन करण्यास सुरुवात केली होती. या आंदोलनाची दखल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडूनही घेण्यात आली होती. महाविकास आघाडीचे काही नेते या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाल्यानंतर सरकार दरबारी हालचाली सुरू झाल्या आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आयोगाच्या अध्यक्षांना विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यानंतर आयोगाकडून आज गुरुवारी सकाळी १० वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत २५ ऑगस्ट रोजी होणारी राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, या आंदोलनाला काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार, तसंच काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी भेट देत पाठिंबा दिला होता. रोहित पवार हे रात्रभर विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी होते. तसंच राज्य सरकारने या आंदोलनावर तोडगा न काढल्यास मी देखील या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता.
नक्की काय होती विद्यार्थ्यांची अडचण?
राज्यसेवा पूर्व परीक्षेचे येत्या रविवारी आयोजन केले जाणार होते. मात्र, त्याच दिवशी आयबीपीएसतर्फे बॅंकिंग क्षेत्रातील विविध पदभरतीसाठीची परीक्षा नियोजित आहे. आयबीपीएस सुमारे वर्षभरापूर्वी परीक्षेची तारीख निश्चित केली होती. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांनी आयबीपीएस परीक्षेसाठी अर्ज केले असून, मागील वर्षभरापासून ते तयारी करीत आहेत. त्यात एमपीएससीने लोकसभा निवडणूक आरक्षण आणि इतर कारणामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत वेळोवेळी बदल केला आणि दि. २५ ऑगस्टला परीक्षेचे आयोजन केले. त्यामुळे या दोन्ही परीक्षेचे फॉर्म भरलेल्या उमेदवारांना एका परीक्षेला मुकावे लागण्याची शक्यता होती. त्यामुळे एमपीएससीने २५ ऑगस्टची परीक्षेची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी केली जात होती.