अध्यक्ष महोदय, ‘त्या’ शेतकऱ्यांनी मग काय करावं? कांदाप्रश्नी धनंजय मुंडेंचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 06:03 AM2023-03-04T06:03:15+5:302023-03-04T06:03:40+5:30
पणन विभागाच्या पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने धनंजय मुंडे बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १७ गोण्या कांदा विक्रीसाठी अहमदनगर येथील बाजार समितीत नेला. ८४४ किलो कांद्याचे वजन भरले आणि हातात एक रुपयाचा ठोकळा आल्याचे वास्तव ‘लोकमत’ने गुरुवारी समोर आणले होते. लगेच शुक्रवारी अधिवेशनात आ.धनजंय मुंडे यांनी हा मुद्दा उपस्थित करीत जर हातात रुपया मिळत असेल तर अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांनी काय करावं, असा प्रश्न उपस्थित केला.
कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय असून, कांद्याचा प्रश्न पेटल्यानंतर आता नाफेडने खरेदी सुरू केल्याचा बनाव सरकार करत आहे. मात्र, राज्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजारपेठांमध्ये २० हजार टन कांद्याची आवक झाली असताना नाफेडने केवळ २०० टन कांदा खरेदी केल्याचे सांगत मुंडे यांंनी सरकारच्या दाव्यालाच आक्षेप घेतला आहे. पणन विभागाच्या पुरवणी मागण्यांच्या निमित्ताने धनंजय मुंडे बोलत होते.
बीड जिल्ह्यातील कडा येथील शेतकरी नामदेव लटपटे या शेतकऱ्याने दोन दिवसांपूर्वी १७ गोण्या कांदा विकल्यांनंतर त्याला १ रुपया मिळाला होता, ती पावतीच मुंडे यांनी विधानसभेत दाखवली.
अटलजींची कविता आणि मुंडेंचे चिमटे
सुमारे साडेसहा हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांचा अभ्यास केल्यास कळते की, भाजपचे मंत्री असलेल्या विभागांना तब्बल ८७ टक्के निधी देण्यात आला आहे, तर मुख्यमंत्री यांच्यासहित शिंदे गटाचे आमदार मंत्री असलेल्या विभागांना केवळ १३ टक्के निधी देण्यात आला आहे. यावरून कोणाच्या मनात काय सुरू असेल याचा अंदाज येतोच, असा टोलाही मुंडे यांनी लगावला.
यावेळी सत्ताधारी पक्षातील नेत्यांना उद्देशून मुंडे यांनी अटलजींची “छोटे मन से कोई बडा नहीं होता, और टूटे मन से कोई खडा नहीं होता”, या ओळी म्हणत चिमटे काढले.