‘मॅट’च्या चेअरमनपदी न्या. मृदुला भाटकर यांची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 05:47 PM2020-04-21T17:47:49+5:302020-04-21T17:52:17+5:30
न्या.मृदुला भाटकर आठ महिन्यांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाल्या. आता त्या ‘मॅट’च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळणार आहेत
यवतमाळ - महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण अर्थात ‘मॅट’च्या चेअरमनपदी मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ७ एप्रिल रोजी त्यांनी आपल्या या पदाचा कार्यभार स्वीकारला.
‘मॅट’च्या स्थापनेपासून आतापर्यंत गेल्या २८ वर्षात पहिल्यांदाच एका महिलेला चेअरमन पदाचा बहुमान मिळाला आहे. ८ जुलै १९९१ ला मुंबई ‘मॅट’ची स्थापना करण्यात आली. औरंगाबाद व नागपूर येथे ‘मॅट’चे खंडपीठ आहेत. न्या.मृदुला भाटकर आठ महिन्यांपूर्वीच मुंबई उच्च न्यायालयातून सेवानिवृत्त झाल्या. आता त्या ‘मॅट’च्या चेअरमन पदाची धुरा सांभाळणार आहे.
उन्हाळी सुटी नाही
‘मॅट’ला मे महिन्यात उन्हाळी सुटी राहते. परंतु यावर्षी लॉकडाऊनमुळे १६ मार्चपासून ‘मॅट’चे कामकाज थांबले आहे. आता लॉकडाऊन उघडल्यास ४ मेपासून कामकाज सुरळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १६ मार्च ते ३ मे हा दीड महिन्याचा कालावधी उन्हाळी सुटी समजण्यात यावा, असे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यातही ‘मॅट’चे कामकाज चालणार आहे.
न्यायिक व प्रशासकीय सदस्यांची पदे रिक्त
‘मॅट’मध्ये दोन न्यायिक सदस्य व दोन प्रशासकीय सदस्य अशी मुंबई, औरंगाबाद व नागपुरातील रचना आहे. परंतु ‘मॅट’मध्ये न्यायिक व प्रशासकीय सदस्यांची अनेक पदे रिक्त आहे. मुंबईमध्ये चेअरमनसह चार पदे आहेत. त्यापैकी प्रशासकीय सदस्याचे पद रिक्त आहे. औरंगाबाद खंडपीठात एक न्यायिक व दोन प्रशासकीय सदस्याची पदे रिक्त आहे. नागपुरात न्यायिक व प्रशासकीय सदस्याचे प्रत्येकी एक पद रिक्त आहे. औरंगाबादला पाटील हे ‘मॅट’चे उपाध्यक्ष आहे.