थकबाकीदार ग्राहकांविरोधात महावितरणची धडक मोहीम

By admin | Published: August 7, 2016 07:25 PM2016-08-07T19:25:59+5:302016-08-07T19:25:59+5:30

जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १ लाख ४२ हजार १५९ ग्राहकांकडे वीजबिलाची ३४ कोटी ८० लाखांची थकबाकी आहे.

MSEDC Campaign launched against the defaulting customers | थकबाकीदार ग्राहकांविरोधात महावितरणची धडक मोहीम

थकबाकीदार ग्राहकांविरोधात महावितरणची धडक मोहीम

Next

ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. 7-  जिल्ह्यात घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील १ लाख ४२ हजार १५९ ग्राहकांकडे वीजबिलाची ३४ कोटी ८० लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणने धडक मोहीम सुरू केली आहे. यात बिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यासाठी कार्यकारी अभियंत्यांपासून ते जनमित्रांपर्यंत सर्वांना वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे, अशी माहिती अधीक्षक अभियंता धनंजय औंढेकर यांनी दिली आहे. 
सोलापूर मंडलात येणाऱ्या अकलूज, पंढरपूर, बार्शी, सोलापूर ग्रामीण व सोलापूर शहर विभागांत घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक वीज वापरासाठीची थकबाकी ३५ कोटींच्या घरात गेली आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी सोलापूर मंडलाने विशेष मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. ज्या ग्राहकांकडे थकबाकी आहे त्यांना थकबाकी भरण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत. दिलेल्या मुदतीत बिल न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १ लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेले १०७ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे २ कोटी ७० लाख थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करण्याची जबाबदारी संबंधित विभागांच्या कार्यकारी अभियंत्यांकडे देण्यात आली आहे. ५० हजारांपेक्षा अधिक थकबाकी असलेले २११ ग्राहक असून, त्यांच्याकडे १ कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे. ही वसुली करण्याची जबाबदारी संबंधित उपविभागीय अभियंत्यांकडे देण्यात आली आहे. ५ हजार ते ५० हजारांदरम्यान थकबाकी असलेले ११ हजार ४ ग्राहक असून, त्यांच्याकडे ११ कोटी ३७ लाखांची थकबाकी आहे. ही वसुली करण्याची जबाबदारी संबंधित शाखा अभियंत्यांकडे देण्यात आली आहे. ५०० ते ५ हजारांदरम्यान थकबाकी असलेले १ लाख ३० हजार ८३७ ग्राहक असून, त्यांच्याकडे १९ कोटी ३० लाखांची थकबाकी आहे. ही वसुली करण्याची जबाबदारी संबंधित जनमित्रांकडे देण्यात आली आहे. 

अधीक्षक अभियंता धनंजय औंढेकर नियमितरीत्या या मोहिमेचा आढावा घेणार आहेत. जनमित्र, शाखा अभियंता, उपविभागीय अभियंत्यांसह संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता अशी महावितरणची संपूर्ण यंत्रणा या मोहिमेत सहभागी झाली आहे. त्यामुळे ग्राहकांकडे आपली थकबाकी तातडीने भरून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

- - - - - - - - -
अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा हवा असेल तर ग्राहकांनी आपली बिले नियमित भरणे आवश्यक आहे. नोटिसीची वाट न पाहता थकबाकीदारांनी आपली बिले भरावीत आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कारवाई टाळावी. 

- धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंता

Web Title: MSEDC Campaign launched against the defaulting customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.