Electricity Bill Hike: महावितरणने मोठा शॉक दिला! वीज दरात वाढ; 80 ते 200 रुपयांनी बिल वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 07:46 PM2022-07-08T19:46:01+5:302022-07-08T20:08:03+5:30
Electricity terrif Hike in Maharashtra by MSEB, Mahavitaran: राज्यातील वीज ग्राहकांना याचा थेट फटका बसणार आहे. इंधन समायोजन आकार शुल्क म्हणजेच FAC मध्ये वाढ झाली आहे.
मुंबई : राज्यातील जनता वाढत्या महागाईने होरपळून निघत असतानाच आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने वीज कंपन्यांना वीज बिलातून इंधन समायोजन आकार वसूल करण्याबाबत मंजुरी दिल्याने वीज ग्राहकांना वीज दरवाढीचे आणखी चटके बसणार आहेत. जून महिन्यापासून पुढील पाच महिने म्हणजे ऑक्टोबर महिन्यापर्यंत इंधन समायोजन आकार वीज ग्राहकांच्या वीज बिलात लागू होणार असून, ही वाढ प्रतियुनिट सरासरी एक रुपया असणार आहे.
जानेवारी, फेब्रूवारी, मार्च, एप्रिल या चार महिन्यांत वीज खरेदीवर झालेला खर्च भरून काढण्यासाठी वीज कंपन्यांच्या वीज बिलात ग्राहकांसाठी इंधन समायोजन आकार लागू केला जाणार आहेत. इंधन समायोजन आकारात वाढ झाल्याने अदानी इलेक्ट्रिसिटीच्या वीज ग्राहकांना प्रति युनिट सरासरी ९२ पैसे एवढी वाढ मोजावी लागेल. तर टाटा पॉवरच्या वीज ग्राहकांना प्रति युनिट सरासरी १ रुपये ५ पैसे एवढी वाढ मोजावी लागणार आहे. दरम्यान, वीज ग्राहकांचा वीज युनिट वापरचा स्लॅब बदलल्यानंतर वीज बिलात वापरानुसार वाढ होणार आहे.
महावितरणच्या इंधन समायोजन आकारात कशी वाढ
० ते १०० युनिट - ६५ पैसे
१०१ ते ३०० युनिट - १ रुपये ४५ पैसे
३०१ ते ५०० युनिट - २ रुपये ५ पैसे
५०१ युनिटवर - २ रुपये ३५ पैसे
कशी होईल वाढ ( कमीत कमी १५ ते १६ टक्के वाढ होईल)
५०० रुपये वीज बिल येत असेल तर आता ५८० रुपये येईल.
१ हजार रुपये वीज बिल येत असेल तर १ हजार २०० रुपये येईल.
१ हजार ५०० रुपये वीज बिल येत असेल तर १ हजार ७०० रुपये येईल.
इंधन समायोजन आकार म्हणजे वीज खरेदी खर्चातील वाढ होय. ही वाढ वीज ग्राहकांकडून वसूल केली जाणार आहे. जुन महिन्याच्या बिलात ही वाढ लागू होईल. महावितरणच्या वीज ग्राहकांना इंधन समायोजन आकारामुळे प्रति युनिट सरासरी एक रुपया मोजवा लागणार आहे. दरमहिन्याला राज्यभरातील सर्व ग्राहकांचा खिसा मिळून एक हजार कोटी रुपयाने जादा कापला जाईल.
- प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना
मार्च आणि एप्रिल महिन्यात मोठया प्रमाणावर विजेचा वापर वाढला होता. विजेची मागणी २६ हजार मेगावॅटवर गेली होती. त्यामुळे या काळात वीज खरेदी करण्यात आली होती. काही भाग २० रुपये तर काही भाग १२ रुपयांनी घेतला होता. वीज खरेदी वाढल्याने इंधन समायोजन आकार वाढला आहे. इंधन समयोजन आकार हा प्रत्येक कंपनीचा वेगळा असतो. तो प्रति युनिट वाढतो.
- अशोक पेंडसे, वीज तज्ज्ञ
अल्प-मुदतीच्या बाजारपेठेत विजेच्या किमतींमध्ये अलीकडेच झालेल्या तीव्र वाढीमुळे महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाद्वारे रीतसर मंजूर केलेला इंधन समायोजन आकार आहे. वीज पुरवठ्याची किंमत आणखी कमी करण्यासाठी आम्ही अतिरिक्त उपाय करत आहोत. ज्यामुळे आमचे ग्राहक येत्या काही महिन्यांत इंधन समायोजन आकार कमी करण्याची अपेक्षा करू शकतात.
- प्रवक्ता, अदानी इलेक्ट्रिसिटी
महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने मंजूर केलेल्या दरांनुसार वीज बिलामध्ये शुल्क आकारले जाईल. इंधन समायोजन आकार रक्कम कमी करण्यासाठी टाटा पॉवर पुरेशा उपाययोजना करत आहे. वीज खरेदी खर्च कमी करण्याच्या दिशेने काम करत केले जात आहे.
- प्रवक्ता, टाटा पॉवर