‘महावितरणच्या प्रादेशिक कंपन्या करणार नाही’
By admin | Published: December 13, 2015 01:46 AM2015-12-13T01:46:58+5:302015-12-13T01:46:58+5:30
‘महावितरण कंपनीचे विभाजन करून पाच प्रादेशिक कंपन्या स्थापन करण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. शिवाय पाच कंपन्या करणे राज्याला परवडणारही नाही,’
मुंबई : ‘महावितरण कंपनीचे विभाजन करून पाच प्रादेशिक कंपन्या स्थापन करण्याचा कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही. शिवाय पाच कंपन्या करणे राज्याला परवडणारही नाही,’ असे स्पष्टीकरण ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
महाराष्ट्र राज्य वीज कामगार, अधिकारी, अभियंते यांच्या सहा संघटनांच्या संयुक्त कृती समितीने विविध मागण्यांसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली, यावेळी ते बोलत होते. बावनकुळे म्हणाले की, ‘महावितरणचा कारभार सुव्यवस्थित करण्याकरिता पाच प्रादेशिक संचालक नेमून त्यांना सर्व अधिकार देत, प्रशासकीय सुधारणा करण्याचा माझा विचार आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी मी सहा संघटनांसोबत चर्चा करून एकमताने निर्णय घेणार आहे. वीज कर्मचारी वर्गाला पेन्शन लागू करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे. शिवाय कर्मचारी वर्गाच्या विविध प्रश्नांबाबतही चर्चा करण्यात येणार असून, कर्मचारी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.’ (प्रतिनिधी)