महावितरणने क्षेत्रीय अभियंत्यांना डावलले?
By admin | Published: October 4, 2016 05:05 AM2016-10-04T05:05:04+5:302016-10-04T05:05:04+5:30
प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ऊर्जा मंत्रालयाने महावितरणचे विभाजन करून औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि कल्याण अशी चार प्रादेशिक कार्यालये स्थापन
मुंबई : प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ऊर्जा मंत्रालयाने महावितरणचे विभाजन करून औरंगाबाद, नागपूर, पुणे आणि कल्याण अशी चार प्रादेशिक कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला असला तरी या निर्णयाआडून महावितरण प्रशासनाने मात्र वीज ग्राहक सेवेला महत्त्व देणाऱ्या क्षेत्रिय अभियंते आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांना डावलले आहे, तर औद्योेगिक संबंध विभागावर (‘आय आर’) मेहरनजर दाखविली असल्याने नाराजीचा सूर आहे.
महावितरणच्या नव्या रचनेनुसार नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे संचालक म्हणून प्रसाद रेशमे यांची, तर पुणे प्रादेशिक कार्यालयाच्या संचालकपदी संजय ताकसांडे यांची नियुक्ती करण्यात आली. औरंगाबाद आणि कल्याण प्रादेशिक कार्यालयासाठी संचालकपदी दोन आयएएस दर्जाचे अधिकारी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव ऊर्जामंत्रालयाने मुख्यमंत्री कार्यालयास पाठविला आहे.
सध्या कल्याण कार्यालयाचा पदभार भांडुपचे मुख्य अभियंता सतीश करपे तर औरंगाबादचा कार्यभार तेथील मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्याकडे देण्यात आला आहे.
प्रादेशिक कार्यालये करताना परिमंडल आणि त्याखालील कार्यालयांतील अभियंत्यांची पदे कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे क्षेत्रिय अभियंत्यांची धावपळ वाढून त्याचा ग्राहक सेवेवर परिणाम होऊ शकतो, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
शिवाय, कधी काळी जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या समकक्ष असणाऱ्या औद्योगिक संबंध अधिकाऱ्यांचे व्यवस्थापनाने भलतेच लाड पुरविले आहेत. जनसंपर्क अधिकाऱ्यांच्या अपग्रेडेशनचा प्रस्ताव असतानाही त्यास केराची टोपली दाखवली गेली आहे. (विशेष प्रतिनिधी)