गळती न रोखणारे महावितरणचे सात अभियंते निलंबित
By admin | Published: May 9, 2016 04:26 AM2016-05-09T04:26:27+5:302016-05-09T04:26:27+5:30
वीजगळती व थकबाकीसाठी जबाबदार धरून औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद शहर, ग्रामीण आणि जालना जिल्ह्यातील ७ अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
औरंगाबाद : वीजगळती व थकबाकीसाठी जबाबदार धरून औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद शहर, ग्रामीण आणि जालना जिल्ह्यातील ७ अभियंत्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. औरंगाबाद शहर विभागाचे अधीक्षक अभियंता प्रभाकर निर्मळ यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
महावितरणचे संचालक (संचलन) अभिजित देशपांडे यांनी शनिवारी परिमंडळ कार्यालयात वीजचोरी, गळती आणि थकबाकीच्या वसुलीचा आढावा घेतला. बैठकीतच त्यांनी दोषी अभियंत्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने उपरोक्त आदेश काढण्यात आले.
मुख्य अभियंता सतीश चव्हाण
यांनी त्यास दुजोरा दिला. सोमवारी त्याबाबत सविस्तर माहिती देतो, असे त्यांनी सांगितले. सक्तीच्या रजेवर पाठविलेल्या निर्मळ यांची नुकतीच मुख्य अभियंतापदी पदोन्नती झालेली आहे. मात्र अजून ते येथून कार्यमुक्त झालेले नव्हते. मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने व्यवस्थापनाची कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे. सोमवारी द्वारसभा घेऊन कारवाईचा निषेध करणार असल्याचे संघटनेने सांगितले. (प्रतिनिधी)
मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेने महावितरण व्यवस्थापनाने एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप केला आहे. सोमवारी औरंगाबाद परिमंडळ कार्यालयासमोर संघटनेने द्वारसभा आयोजित केली आहे. त्यात व्यवस्थापनाने सर्व मागासवर्गीय अभियंत्यांविरुद्ध कारवाई करून मर्जीतल्या अभियंत्यांना पाठीशी घालण्यात आल्याबद्दल निषेध केला जाणार आहे.अतिरिक्त कार्यकारी अभियंता मेश्राम, सहायक अभियंता रवींद्र मोरे, उपकार्यकारी अभियंता रणधीर खंडागळे, उपअभियंता निर्मळे, उपअभियंता सोनवणे, उपकार्यकारी अभियंता सचिन राऊत आणि सहायक अभियंता नामदेव केंद्रे यांच्यावर कारवाई होणार आहे.