MSRDC चे प्रकल्प, कार्यालये सौरऊर्जेने उजळणार; संपूर्णपणे अक्षय्य ऊर्जेच्या वापराच्या दिशेने पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 06:01 AM2024-07-03T06:01:17+5:302024-07-03T06:01:52+5:30

सल्लागाराला प्रकल्पाचा सुसाध्यता अहवाल तयार करावा लागेल. त्याचबरोबर डीपीआर तयार करून कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदाप्रक्रिया राबवावी लागणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

MSRDC projects, offices to be lit by solar energy; A step towards the use of entirely renewable energy | MSRDC चे प्रकल्प, कार्यालये सौरऊर्जेने उजळणार; संपूर्णपणे अक्षय्य ऊर्जेच्या वापराच्या दिशेने पाऊल

MSRDC चे प्रकल्प, कार्यालये सौरऊर्जेने उजळणार; संपूर्णपणे अक्षय्य ऊर्जेच्या वापराच्या दिशेने पाऊल

मुंबई - मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची उभारणी करणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची (एमएसआरडीसी) राज्यभरातील कार्यालये तसेच प्रकल्प सौर ऊर्जेने उजळून निघणार आहेत. समृद्धी महामार्गालगतच्या मोकळ्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन असून, त्यासाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. 

मुंबईतील मुख्यालय, पुणे, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद येथील विभागीय कार्यालये तसेच विविध टोलनाके यांसाठी एमएसआरडीसीला मोठ्या प्रमाणात विजेची गरज भासते. समृद्धी महामार्गावर इगतपुरी येथे आठ किमी लांबीचा तर मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर उभारण्यात येत असलेल्या मिसिंग लिंकवर नऊ किमी लांबीचा बोगदा या ठिकाणी विजेच्या दिव्यांसह वायुव्हिजन यंत्रणा उभारावी लागणार आहे. या सगळ्यांसाठी एकंदर १५ मेगावॉट विजेची गरज भासणार आहे. 

या विजेची गरज पर्यावरणपूरक अक्षय्य ऊर्जेतून भागविण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. त्यातून प्रदूषणकारी पारंपरिक विजेचा वापर घटणार आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गालगत इंटरचेंज आणि अन्य भागांत असलेल्या मोकळ्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर अन्य पर्यायांमधूनही वीज उपलब्ध होऊ शकते का, याची चाचपणी एमएसआरडीसी करत आहे. त्यासाठी एमएसआरडीसीकडून सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असून, निविदा मागविण्यात आल्या आहेत.

सल्लागाराला प्रकल्पाचा सुसाध्यता अहवाल तयार करावा लागेल. त्याचबरोबर डीपीआर तयार करून कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदाप्रक्रिया राबवावी लागणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. एमएसआरडीसीच्या अंदाजानुसार समृद्धी महामार्गालगतच्या आणि इंटरचेंजजवळच्या जागेत सौर ऊर्जा प्रकल्प उभारून जवळपास १४० ते १४५ मेगावॉट विजेची निर्मिती करता येणार आहे. यातील एमएसआरडीसीच्या प्रकल्पांसाठी लागणारी विजेची गरज भागवून अन्य वीज खुल्या बाजारात विकता येईल. त्यातून एमएसआरडीसीला उत्पन्नाचा स्रोतही उपलब्ध होईल आणि विजेच्या वापरावर होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या खर्चातही बचत होऊ शकणार आहे. 

एमएसआरडीसीची विजेची गरज भागविण्यासाठी आणि वीज वापर नेट झीरो करण्यासाठी, त्याचबरोबर ग्रीन एनर्जी वापरासाठी सौर ऊर्जेच्या वापरावर भर देत आहोत. हे वातावरणीय बदलांना समोरे जाण्यासाठी पर्यावरणपूरक ऊर्जा वापराच्या दिशेने पाऊल आहे. त्यासाठी समृद्धी महामार्गालगत सौर ऊर्जा प्रकल्प उभारत आहोत. - मनूज जिंदाल, सहव्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी

Web Title: MSRDC projects, offices to be lit by solar energy; A step towards the use of entirely renewable energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.