एसटी सेवा हळूहळू मार्गावर; २ दिवसांत वाढल्या हजार गाड्या, ५० टक्के कर्मचारी रुजू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 06:12 AM2022-04-16T06:12:53+5:302022-04-16T06:13:11+5:30
गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आता कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने एसटीच्या फेऱ्या वाढल्या आहेत.
मुंबई :
गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र, आता कर्मचारी कामावर रुजू होत असल्याने एसटीच्या फेऱ्या वाढल्या आहेत. सध्या ७ हजार गाड्या सुरू असून, प्रवासीसंख्या १५ लाखांपर्यंत गेली आहे. एसटी हळूहळू रुळावर येत आहे. येत्या काही दिवसांत आणखी मोठ्या संख्येने कर्मचारी रुजू होतील, अशी माहिती आहे.
राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. ग्रामीण भागातील विशेषतः गाव-खेड्यातील प्रवासी वर्ग प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून आहे. लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली.
प्रवासीसंख्येत अडीच लाखांची वाढ
पाच महिन्यांनंतर एसटीमध्ये कर्मचारी रुजू होण्याचा आकडा वाढला आहे. १३ एप्रिलपर्यंत सहा हजार गाड्या सुरू होत्या. मात्र, दोन दिवसांत त्यात एक हजारांची वाढ झाली असून, त्या सात हजार झाल्या आहेत, तर प्रवासीसंख्येत अडीच लाखांची वाढ झाली आहे.
उत्पन्न पाेहाेचले दहा कोटींपार
- कोरोनापूर्व काळात दररोज ६५ लाख प्रवासी एसटीने प्रवास करत होते. महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून उत्पन्न २१ कोटी मिळत होते.
- कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी वाहतूक अंशतः सुरू होती.
- कर्मचारीसंख्या वाढल्यानंतर आता ७ हजार गाड्या सुरू झाल्याने उत्पन्नाचा आकडा १० कोटींच्या पार गेला आहे.
४५००० कर्मचारी परतले
एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या आणि इतर मागण्यांसाठी सुरू असलेल्या एसटी कामगारांचा संप सुरू होता. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. आतापर्यंत रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आकडा ४५ हजारांपर्यंत पोहोचला आहे.
न्यायालयाच्या निर्णयानंतर रुजू होणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. राज्यात विविध ठिकाणी असलेल्या जत्रांच्या पार्श्वभूमीवर गाड्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आता ७ हजार गाड्या सुरू असून, त्याला प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ