एसटी बंद, चर्चेच्या फेऱ्या मात्र सुरू; संपामुळे प्रवाशांची गैरसोय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 07:30 AM2021-11-14T07:30:54+5:302021-11-14T07:31:16+5:30
माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजप आ. गोपीचंद पडळकर व कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. मात्र चर्चेच्या केवळ फेऱ्या सुरू असून एसटी सेवा मात्र बंद आहे.
मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनात कर्मचारी कुटुंबीयांसह ठाण मांडून बसले आहेत. राज्यात बहुसंख्य ठिकाणी एसटीच्या फेऱ्या बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय सुरू आहे.
माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजप आ. गोपीचंद पडळकर व कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. मात्र चर्चेच्या केवळ फेऱ्या सुरू असून एसटी सेवा मात्र बंद आहे.
यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, वित्त सल्लागार तथा मुख्य लेखाधिकारी मंदार पोहरे उपस्थित होते. तर कामगारांच्या शिष्टमंडळात सविता पवार, दिलीप घोडके, शरद कोष्टे, विनित फडके, सतीश मेटकरी आदी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.
बैठकीनंतर परब म्हणाले की, कामगार संघटनांच्या मागण्यांनुसार कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता व घरभाडे भत्ता वाढवून दिला आहे. वेतनवाढीसंदर्भात दिवाळीनंतर चर्चा करू, असे सांगितले होते. एसटी सेवा तोट्यामध्ये चालवण्याची महामंडळाची इच्छा नाही. त्यासाठी उत्पन्नाचा स्रोत वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे त्यांनी सांगितले. बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. विलीनीकरणाबाबत समितीला १२ आठवड्यांची मुदत दिली आहे. हा कालावधी कमी करण्यासाठी सरकारने सकारात्मक दाखवली आहे. अजून संप मागे घेतलेला नाही, असे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले.
७१ एसटी धावल्या
शुक्रवारी १,५०० तर शनिवारी ३,००० कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. शनिवारी ७१ एसटी धावल्या, त्यातून सुमारे दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला.