मुबारक बेगम यांचे निधन
By admin | Published: July 19, 2016 06:29 AM2016-07-19T06:29:55+5:302016-07-19T06:29:55+5:30
‘कभी तनहाईयों में हमारी याद आयेगी’, ‘मुझको अपने गले लगा लो’, या गीतांसह असंख्य गाणी आपल्या समधूर आवाजाने अजरामर करणाऱ्या प्रख्यात पार्श्वगायिक मुबारक बेगम (८०) यांचे मुंबईत रात्री उशीरा निधन झाले.
मुंबई : ‘कभी तनहाईयों में हमारी याद आयेगी’, ‘मुझको अपने गले लगा लो’, या गीतांसह असंख्य गाणी आपल्या समधूर आवाजाने अजरामर करणाऱ्या प्रख्यात पार्श्वगायिक मुबारक बेगम (८०) यांचे मुंबईत रात्री उशीरा निधन झाले. १९४९ ते १९७२ या कालावधीत मुबारक बेगम यांनी गायलेल्या गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते. आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये मुबारक बेगम यांचे जीवन अतिशय हालअपेष्टांमध्ये गेले. आर्थिक बाबींशी त्यांचा संघर्ष शेवटपर्यंत सुरू होता. सरकारनेही त्यांना वेळोवेळी मदत केली होती.
राजस्थानमधील चुरु जिल्ह्यातील सुजानगडमध्ये मुबारक बेगम यांचा जन्म झाला होता. लता मंगेशकर, सुमन कल्याणपूर, वाणी जयराम यांच्यासोबत मुबारक बेगम यांनी अनेक गाणी गायली, ती प्रचंड लोकप्रियही ठरली. १९४९मध्ये आईये या चित्रपटात लतादीदींसोबत त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली होती. कैफी आझमी, एस.डी.बर्मन, मोहम्मद रफी, खय्याम, शंकर-जयकिशन या दिग्गजांसोबतही त्यांनी काम केले होते. ‘हमारी याद आयेगी’ या चित्रपटातील ‘कभी तनहाईयो में’ आणि १९६५ मधील ‘खूनी खजाना’ या चित्रपटातील ‘ए दिल बता हम कहाँ आ गये’ या गाण्यांनी त्यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली.
बिकट आर्थिक परिस्थितीमुळे मुबारक बेगम या आयुष्याच्या शेवटच्या काळात पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. त्यानंतर मनेका गांधी यांनी देखील त्यांना मदत करण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले होते. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनीही त्यांची भेट घेऊन मदत दिली होती. हिंदी आणि उर्दू गाण्यांसोबतच मुबारक बेगम यांनी अत्यंत ताकदीने पंजाबी, मारवाडी आणि गुजराती भाषांमध्येही गाणी गायली होती. १४६ चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी सुमारे २०० हिंदी गाण्यांना आपला सुमधूर आवाज दिला होता. (प्रतिनिधी)