मुुस्लिम साहित्याने वेगळेपण जपत पुढे जावे
By admin | Published: May 22, 2016 04:14 AM2016-05-22T04:14:01+5:302016-05-22T04:14:01+5:30
मुस्लिम या मातीतला आहे, तरीही संशयाचं वातावरण निर्माण करून त्यावर बळजबरीने लादल्या गेलेल्या परकेपणामुळे त्याचं एकाच वेळेला आत आणि बाहेर असणं त्याला वेगळी दृष्टी देते
कोल्हापूर : मुस्लिम या मातीतला आहे, तरीही संशयाचं वातावरण निर्माण करून त्यावर बळजबरीने लादल्या गेलेल्या परकेपणामुळे त्याचं एकाच वेळेला आत आणि बाहेर असणं त्याला वेगळी दृष्टी देते. इतरांच्या नजरेतून निसटलेलं वास्तव तो पाहू शकतो. हेच वेगळेपण घेऊन मुस्लिम साहित्याने पुढे सरकायला हवे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांनी व्यक्त केले.
मुस्लिम साहित्य चळवळीला २५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुस्लिम बोर्डिंग हाऊसतर्फे शनिवारी येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित मुस्लिम मराठी साहित्य संमेलनात ते बोलत होते. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.
संमेलनाध्यक्षपदावरुन बोलताना खान म्हणाले, की जगभर साहित्य, नाटक बदलत आहे. उसन्या अनुभवानंतर काल्पनिक साहित्य रचणारे मागे पडले आहेत. कारण आता प्रत्यक्ष दु:ख, वेदना भोगणारेच आपल्या भाषेत बोलू, लिहू लागले आहेत. त्यांनी लिहावं म्हणून जगभर प्रयत्न केले जात आहेत. ते स्वीकारलंही जात आहे. साहित्य चळवळीतील वेगळपण समजून घेऊन वाचकांना सांगणारे समीक्षकही आपल्याकडे तयार व्हायला हवेत, तरच हा साहित्यप्रवाह बळकट होईल. सध्याच्या सामाजिक परिस्थतीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्या जात आहेत. परिघाबाहेरची माणसं कष्टानं बोलू पाहत होती. त्यांचे आवाज निर्दयीपणे दडपले जात आहेत. त्यामुळे समविचारी साहित्यिकांनी एकत्र येणं, निर्भय बोलणं, विचार ऐक णं, यासाठी अशी छोटी साहित्य संमेलने महत्त्वाची आहेत.
स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, भाषेला कोणताही धर्म नसतो. भाषेच्या विकासात सर्वच धर्मातील संतांनी योगदान देऊन समृद्ध केले आहे. महाराष्ट्रातील मुस्लिमांचीही मातृभाषा मराठीच असल्याने त्यांचे योगदान भाषा विस्तारासाठी मोलाचे आहे. स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. ताज मुलानी यांनी सूत्रसंचालन, गणी आजरेकर यांनी स्वागत, तर डॉ. राजेखान शाणेदिवाण यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)