मुनगंटीवारांचं ते वक्तव्य म्हणजे, 'मुंगेरीलाल के हसीन सपने'; अशोक चव्हाणांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 02:42 PM2020-01-30T14:42:51+5:302020-01-30T14:44:21+5:30
भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांमध्ये वितुष्ठ निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे माध्यमांना माझी विनंती आहे की, त्यांनी भाजपचं जास्त ऐकू नये, असही अशोक चव्हाण यांनी सांगितले.
मुंबई - शिवसेनेने सत्तास्थापनेचा उद्याही प्रस्ताव दिला तर भाजपा शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास तयार असल्याचे मत भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले होते. त्यावर आता काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. मुनगंटीवार यांचे वक्तव्य म्हणजे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' असल्याचा टोला चव्हाण यांनी लगावला.
नांदेडच्या दौऱ्यावर असताना भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली होती. तसेच शिवसेना हा पक्ष भाजपाचा नैसर्गिक मित्र आहे. शिवसेनेनं उद्याही प्रस्ताव दिला, तर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून अडचण नाही. सारे काही विसरून शिवसेनेने भाजपपुढे प्रस्ताव ठेवल्यास 'सुबह का भुला श्याम को लौट आया' असे समजून आम्ही त्याचा विचार करू असंही मुनगंटीवार म्हणाले होते.
मुनगंटीवार यांचे शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसंदर्भातील वक्तव्य म्हणजे 'मुंगेरीलाल के हसीन सपने' असच म्हणावे लागेल. भाजपकडून सातत्याने महाविकास आघाडीतील तीन्ही पक्षांमध्ये वितुष्ठ निर्माण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळे माध्यमांना माझी विनंती आहे की, त्यांनी भाजपचं जास्त ऐकू नये, असही अशोक चव्हाण यांनी सांगितले. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाडांच्या इंदिरा गांधी यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. तसेच आव्हाडांनी खुलासा केल्यानंतर तो विषय संपल्याचे म्हटले.