मुंबई वेगळी करणा-यांचे पाय छाटू - राज ठाकरे
By admin | Published: February 2, 2017 04:21 AM2017-02-02T04:21:50+5:302017-02-02T08:55:25+5:30
भाजपाची पावले हुकूमशाहीच्या दिशेने पडू लागली आहेत. आधी विदर्भ आणि नंतर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठी योजना हाकल्या जात आहेत. केवळ भाजपाला रोखण्यासाठी
मुंबई : भाजपाची पावले हुकूमशाहीच्या दिशेने पडू लागली आहेत. आधी विदर्भ आणि नंतर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्यासाठी योजना हाकल्या जात आहेत. केवळ भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेपुढे युतीचा प्रस्ताव ठेवला होता. मनसे किंवा स्वत:साठी नाहीतर तर मराठीसाठी हात पुढे केला होता. पण माझ्यासाठी आज हा विषय संपला, अशा शब्दात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्वबळावर महापालिका निवडणुकांना सामारे जाणार असल्याचे बुधवारी स्पष्ट केले.
दादर येथील शिवाजी मंदीर सभागृहात मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार हल्ला चढविला. शिवसेना-मनसे युतीबाबत सुरु असलेल्या उलटसुलट चर्चेचा संदर्भ देत राज म्हणाले की, भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाच्या हातात सत्ता गेली तर मुंबईत मराठी माणसाचे अस्तित्व राहणार नाही. त्यामुळेच शिवसेनेसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. उद्धव ठाकरेंना सात वेळा फोन केला, पण त्यांनी एकदाही फोन उचलला नाही, असे राज ठाकरे यांनी सांगितले. टाळी झिडकारली किंवा, लाथाडले अशी चर्चा आहे. पण आपण मराठी माणसासाठी कुणाचेही पाय चाटू. मात्र मुंबई मराठी माणसापासून वेगळी करण्याचा प्रयत्न केला तर पाय छाटू , असा इशाराही त्यांनी दिला.
सगळे काही आम्हालाच हवे असा हट्ट भाजपाने चालविला आहे. एकप्रकारची हुकुमशाहीच देशात पाहायला मिळते आहे. भाजपकडून केवळ आश्वासने दिली जातात. थापा या शब्दाला पयार्यी शब्द भाजपा आहे. गुगलला फेकू हा शब्द टाईप केला की मोदींचे नाव येते, जगात आपली हीच प्रतिमा आहे का, असा टोला राज यांनी लगावला. सेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना स्वत:कडे बघा. २५ वर्षे त्यांच्यासोबत तुम्हीपण सत्तेत होतात. दोघांनी मिळून भ्रष्टाचार केला आहे. नाशिक ही राज्यातील एकमेव महापालिका आहे, जिथे भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. पारदर्शी कारभाराच्या भाजपा-शिवसेना फक्त गप्पा मारतात, पण पारदर्शी कारभार काय असतो, ते मी नाशिकध्ये दाखवून दिले आहे, असे राज यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीसाठी एकजुटीने उभे रहा. पुढचे १८ दिवस मनसैनिकांनी व्यक्ती म्हणून नाही, तर पक्ष म्हणून काम करावे. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांतील मराठी माणसांनी विचार करुन मतदान करावे असे आवाहन केले. (प्रतिनिधी)
महापौर बंगला हडपायचा आहे
दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे केवळ निमित्त आहे. बाळासाहेबांच्या नावाखाली महापौर बंगल्याची जागा हडपायची आहे. त्यासाठीच शिवसेना भाजपाला सोडू शकत नाही. केंद्र आणि राज्याच्या सत्तेतून जो पैसा येतो तो सुटत नाही. त्यामुळेच शिवसेना भाजपाला चिटकून असल्याचा आरोप राज यांनी केला.