मूकबधिर, अंध सौरभ चौगुले देणार दहावीची परीक्षा
By admin | Published: March 7, 2017 01:46 AM2017-03-07T01:46:19+5:302017-03-07T01:46:19+5:30
जन्मत: मूकबधिर असतानाच वयाच्या बाराव्या वर्षी अंधत्व आल्याने त्याचे भविष्य अंधूक झाले होते.
पूजा दामले,
मुंबई- जन्मत: मूकबधिर असतानाच वयाच्या बाराव्या वर्षी अंधत्व आल्याने त्याचे भविष्य अंधूक झाले होते. कोसळलेल्या या संकटाखाली दबून जाऊन नियतीला दोष देत बसण्यापेक्षा त्याच्या पालकांनी निर्णय घेतला, मुलाला ज्ञानार्जनासाठी स्वत:पासून लांब पाठवले. मूकबधिर, अंध असूनही जिद्द न हरता त्याने पुन्हा एकदा शिक्षण घ्यायला सुरुवात केली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सौरभ चौगुले यंदा दहावीची परीक्षा देणार आहे. हेलन केलरप्रमाणेच सौरभही झटतो आहे. महाराष्ट्रातून मूकबधिर, अंध असणारा सौरभ दहावीची परीक्षा देणारा पहिला विद्यार्थी आहे.
मूळचा सांगलीचा असणारा सौरभ चौगुले हा जन्मत: मूकबधिर आहे. प्राथमिक शिक्षण त्याने सांगली येथील मूकबधिरांसाठीच्या शाळेत घेतले. तिथे मराठी माध्यमात शिकणारा सौरभ लिहायला - वाचालया शिकला. पण, वयाच्या १०व्या वर्षानंतर त्याची दृष्टिक्षमता कमी होत गेली. वयाच्या १२व्या वर्षी तो दृष्टिहीन झाला. त्यामुळे सांगलीतील मूकबधिरांच्या शाळेत त्याला शिक्षण घेणे शक्य नव्हते. त्यामुळे सौरभला त्याच्या पालकांनी हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर डेफ अॅण्ड डेफ ब्लार्इंड या शाळेत दाखल केल्याचे सौरभच्या शिक्षिका देवयानी हडकर यांनी सांगितले.
सौरभला शाळेत दाखल केल्यानंतर त्याला पुन्हा एकदा प्रशिक्षण देणे आवश्यक होते. पहिल्या दोन ते तीन वर्षांत त्याला संवाद साधण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. मूकबधिर असलेल्या सौरभला अंधत्व आल्याने त्याला संवाद कसा साधायचा, हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे प्राथमिक गरजांसाठी संवाद साधणे आणि शिकण्यासाठी ‘स्पर्शनिय सांकेतिक भाषा’ त्याला शिकविण्यात आली. या भाषेचे आकलन झाल्यानंतर त्याचा अभ्यास पुन्हा एकदा सुरू करण्यात आला. आता वयाच्या २१व्या वर्षी सौरभ दहावीची परीक्षा देत आहे. दहावीच्या परीक्षेसाठी सध्या सौरभचा जोरदार अभ्यास सुरू आहे. सौरभचा दिवस पहाटे ५ वाजता सुरू होऊन रात्री १२ला संपतो. दिवसभर तो शिक्षकांच्या मदतीने अभ्यास करत असतो.
सौरभला संगणक वापरता येतो. त्याला संगणक वापरता यावा म्हणून विशिष्ट सॉफ्टवेअर, हार्डवेअरचा वापर केला जातो. सौरभ ब्रेललिपीवर लिहू आणि वाचू शकतो. पण, अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी त्याच्याकडे गाईड अथवा अन्य साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे सौरभ अभ्यासासाठी पूर्णत: शिक्षकांवर अवलंबून आहे. सौरभच्या परीक्षेसाठी आधी त्याचे शिक्षक नसावेत असे बोर्डाचे म्हणणे होते. पण, त्यांना सर्व बाबींची कल्पना दिल्यावर संवाद साधून त्याला प्रश्न समजवून देण्यासाठी परवानगी घेतली.
>सौरभ देणार या विषयांची परीक्षा
भाषा (तिसरी), समाजशास्त्र, गणित, इन्फर्मेशन टेक्नोलॉजी, विज्ञान (आरोग्यशास्त्र, शरीरशास्त्र, गृहशास्त्र), बेकरी प्रोडक्ट, दुग्धजन्य पदार्थ
१४ मार्च ते २२ एप्रिलदरम्यान होणार परीक्षा
सौरभ चौगुले याची परीक्षा १४ मार्चला सुरू होणार आहे. ७ मार्चपासून सुरूहोणाऱ्या बारावीच्या परीक्षेत पहिल्या आणि दुसऱ्या भाषांचे पेपर घेतले जातात. त्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या भाषेचा पेपर घेतला जातो. त्यामुळे सौरभची परीक्षा १४ मार्चला सुरू होऊन २२ एप्रिलला संपणार आहे.
चौघा विद्यार्थ्यांचा आदर्श
हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर डेफ अॅण्ड डेफ ब्लार्इंड यांच्याकडून २००९मध्ये मूकबधिर आणि अंध असणाऱ्या ४ विद्यार्थ्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ओपन स्कूलिंगमधून दहावीची परीक्षा दिली होती.
>लेखनिकाबरोबर संवादकही मदतीला
सौरभ हा मूकबधिर आणि अंध असल्यामुळे पेपर लिहिताना त्याला लेखनिकाबरोबरच संवादक देण्यात आला आहे. कारण, सौरभला पेपर वाचून दाखवणे आणि त्याचे उत्तर समजून घेण्यासाठी संवादकाची आवश्यकता आहे. बोर्डाकडे सौरभला ब्रेलमध्ये पेपर लिहिण्याची परवानगी मागितली होती. पण, ती परवानगी न मिळाल्याने लेखनिकाची गरज आहे.
>सौरभचा मित्रही देणार दहावीची परीक्षा
कर्नाटक येथील मूळचा रहिवासी असलेला मोहम्मद हानिफ भायजी हा गेल्या तीन वर्षांपासून हेलन केलर इन्स्टिट्यूट फॉर डेफ अॅण्ड डेफ ब्लार्इंड या शाळेत शिक्षण घेत आहे. मोहम्मद हा मूकबधिर असून, गेल्या दोन वर्षांपासून त्याला रातांधळेपणा आला आहे. मोहम्मदला फक्त समोरचे दिसते.