‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 05:17 PM2024-09-25T17:17:06+5:302024-09-25T17:18:50+5:30

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scam: लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटण्यासाठी ६ लाडक्या भावांनी अर्ज केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

mukhyamantri ladki bahin yojana fraud scam 6 male apply in akola and govt took action | ‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध

‘लाडकी बहीण’ योजनेत पुन्हा गैरप्रकार समोर; ६ लाडक्या भावांचे अर्ज, ‘असा’ लागला शोध

Mukhyamantri Ladki Bahin Yojana Scam: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येतात. या योजनेत आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केले आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात वळता करण्यात आला आहे. यातच या योजनेतील गैरप्रकार सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी ३० गुन्हे दाखल झाले असून, लाखो रुपये गैरप्रकारातून लाटण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या योजनेची मुदत वाढवण्यात आली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखी वाढवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. या योजनेंतर्गत आत्तापर्यंत २ कोटींपेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाला आहे. या योजनेचा तिसऱ्या हप्त्याचे वितरणे येत्या २९ सप्टेंबर रोजी होणार आहे. यातच आता लाडकी बहीण योजनेसाठी ६ पुरुषांनी अर्ज केल्याचा प्रकार समोर आला आहे.

नारीशक्ती अ‍ॅपवरून ६ लाडक्या भावांचा योजनेसाठी अर्ज 

लाडकी बहीण योजनेत आणखी एक गैरप्रकार समोर आला आहे. या योजनेत आता सहा लाडक्या भावांनी अर्ज केल्याची माहिती देण्यात आली आहे. हे सर्व जण अकोल्यातील आहेत. या योजनेसाठी असलेल्या 'नारीशक्ती दूत' अ‍ॅपवर अकोला शहरातील सहा व्यक्तींनी योजनेचा अर्ज भरला. अर्जाच्या छाननीत ही बाब समोर आली. यात या सहा पुरुषांनी खोटी माहिती भरत योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला. या सहा जणांकडून याचा खुलासा मागविण्यात आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच या योजनेसाठी खोटी माहिती भरून लाभ घेऊ पाहणाऱ्या या सहा जणांचे आधार कार्ड महिला आणि बालकल्याण विभागाकडून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारकडून राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेला राज्यात मोठा प्रतिसाद मिळत आहे. एकट्या अकोला जिल्ह्यातील ४ लाख ३५ हजार २३८ महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन फॉर्म भरलेत. यापैकी ४ लाख २६ हजार २४० अर्ज मंजूर झाल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: mukhyamantri ladki bahin yojana fraud scam 6 male apply in akola and govt took action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.