मुक्ताची आगपाखड आणि तातडीने स्वच्छता!
By admin | Published: July 14, 2017 01:12 AM2017-07-14T01:12:01+5:302017-07-14T01:12:01+5:30
एकीकडे स्मार्ट सिटीची स्वप्नं पाहिली जात असताना, शहराचे सांस्कृतिक केंद्र असणाऱ्या नाट्यगृहांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एकीकडे स्मार्ट सिटीची स्वप्नं पाहिली जात असताना, शहराचे सांस्कृतिक केंद्र असणाऱ्या नाट्यगृहांमधील स्वच्छतागृहांची दुरवस्था... सफाई कामगारांची गैरहजेरी... कलाकार आणि नागरिकांना होणारा त्रास आणि मनस्ताप... व्यवस्थापनाकडून होणारे दुर्लक्ष, अशी बिकट स्थिती नित्याची झाली आहे. या गलथान कारभार आणि बेजबाबदार वर्तनाबाबत अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने फेसबुक पेजवरून खरमरीत टीका केली आणि वेगाने सूत्रे फिरली.
महानगरपालिकेच्या कामकाजाच्या नाराजीची दखल घेत नाट्यगृहातील स्वच्छतागृहांची तातडीने युद्धपातळीवर साफसफाई करण्यात आली. याप्रकरणाची महापौर मुक्ता टिळक यांनीही दखल घेत चौकशीचे आदेश दिले. नाट्यगृहातील अस्वच्छतेला कारणीभूत असलेल्या संबंधितांवर प्रसंगी निलंबनाची कठोर कारवाई करण्यात येईल, अशी हमीही त्यांनी दिली.
‘याला गलथानपणा म्हणायचा की बेजबाबदारपणा की उद्दामपणा? गेले अनेक महिने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सफाई कामगार नाहीयेत. टेंडरवर कोणाची तरी सही राहिलीये, असं कारण सांगितलं जातंय. नाटकावर प्रेम करणारे रसिक आणि कलाकार मिळाले म्हणून तुम्ही आम्हाला गृहीत धरणार का? अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक बाब आहे ही.’ अशा शब्दांत मुक्ता बर्वेने आपल्या फेसबुक पेजवरून नाट्यगृहातील अस्वच्छतेवर ताशेरे ओढले. स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेचे ‘दर्शन’ घडवणारे फोटोही तिने अपलोड केले. यानंतर तिच्या पोस्टला पाठिंबा देणाऱ्या आणि महानगरपालिका प्रशासनाची उदासिनता अधोरेखित करणाऱ्या कॉमेंटचा अक्षरश: पाऊस पडला.
यामुळे स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्यासह नगरसेवकांनी नाट्यगृहाकडे धाव घेतली. आयुक्त कुणाल कुमार यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत माहिती देण्यात आली. सफाई सेवकांच्या मदतीने युद्धपातळीवर स्वच्छता करण्यात आली. यापुढील काळात स्वच्छतेचे काम आऊटसोर्सिंगने योग्य कंपनीला देण्यात येईल, असे मोहोळ म्हणाले.
या वेळी भाजपाचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर, स्थानिक नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, दुष्यंत मोहोळ, ज्ञानेश्वर मोहोळ, दिनेश माथवड, नवनाथ जाधव आदींनी हजेरी लावली. या वेळी मुख्य व्यवस्थापक प्रकाश अमराळे, व्यवस्थापक बारटक्के, विभागीय आरोग्य निरीक्षक अविनाश तेलकर यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले.
>यापूर्वीही दुरवस्थेचे चित्रण : कलाकारांच्या नाराजीची मालिकाच
याआधीही अनेक कलाकारांनी नाट्यगृहांच्या दुरवस्थेचे चित्रण सोशल मीडियाच्या माध्यमातून निदर्शनास आणले होते. महाकवी कालिदास नाट्यगृहातील व्यवस्थेविषयी अभिनेते प्रशांत दामले यांनीही काही दिवसांपूर्वी फेसबुकवर फोटो टाकले होते. कालिदास नाट्यगृहाच्या प्रेक्षकगृहातील तुटलेल्या खुर्च्या, फाटलेले कुशन या फोटोंमध्ये स्पष्ट दिसत होते. त्यापूर्वी अभिनेता सुमीत राघवनने डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहाच्या दुरवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. नाट्यगृहांतील गैरसोयीचे चित्रण दाखवणारे व्हिडिओही शेअर केले आहेत. आता मुक्तानेही नाट्यगृहांच्या गैरसोयीवर प्रकाश टाकला आहे.
>घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्राला भेट दिली, तेव्हा तेथेही अस्वच्छतेचा अनुभव आला होता. नाट्यगृहातील अस्वच्छतेची गंभीर दखल घेतली असून, कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाट्यगृहांच्या स्वच्छतेची कामे खासगी ठेकेदारांना देण्यात आली होती. नेमके काय झाले आहे, याची चौकशी करण्यात येत आहे. याठिकाणी स्वच्छता कशी राहील, याची काळजी घेण्यात येईल.
- मुक्ता टिळक, महापौर
>टेंडरची प्रकिया पूर्ण झाली नसल्याने अद्याप सफाई कामगार नेमण्यात आलेले नाहीत. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत क्षेत्रीय कार्यालयाकडून सफाई सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज सफाई कामगारांना कामावर यायला थोडा उशीर झाला. अस्वच्छतेची तातडीने गंभीर दखल घेऊन स्वच्छता करण्यात आली आहे. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी काळजी घेतली जाईल.
- प्रकाश अमराळे, मुख्य व्यवस्थापक