मल्टिप्लेक्स करमणूक ‘ विशी ’ च्या उंबरठ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 06:00 AM2019-04-21T06:00:00+5:302019-04-21T06:00:07+5:30
सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टिप्लेक्स चित्रपटगृह हे महाराष्ट्रातील पहिले ‘मल्टिप्लेक्स’ होय.
अतुल चिंचली
पुणे : ‘‘चित्रपटप्रेमी भारतात ‘मल्टिप्लेक्स’ची सध्या चलती आहे. परदेशातून आलेली ही संकल्पना असली तरी आता भारतासारखी आरामदायी आणि दर्जेदार ‘मल्टिप्लेक्स’ चित्रपटगृहे जगात नाहीत. भारतीय मल्टिप्लेक्स जगात भारी आहेत,’’ असे मत मत ‘सिटी प्राईड’चे मालक अरविंद चाफळकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड मल्टिप्लेक्स चित्रपटगृह हे महाराष्ट्रातील पहिले ‘मल्टिप्लेक्स’ होय. आजच्याच दिवशी (२१ एप्रिल) सन २००१ मध्ये या मल्टिप्लेक्समध्ये पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. अकरा कोटींच्या गुंतवणुकीतून सुरु झालेल्या या पहिल्या मल्टिप्लेक्सचे अनुकरण पुढे राज्यातल्या अनेक शहरांमध्ये झाले. राज्यात ‘मल्टिप्लेक्स’ची मुहूर्तमेढ रोवणाºया सिटीप्राईडच्या वर्धापनदिनानिमित्त ‘लोकमत’ने चाफळकर यांच्याशी संवाद साधला.
प्रश्न - नव्या संकल्पनेला पुणेकरांचा प्रतिसाद कसा मिळाला?
-सुरुवातीला सातारा रस्त्यावरील मल्टिप्लेक्सला तीन पडदे होते. सहा महिन्यात चौथा पडदा चालू करण्यात आला. पुढे कोथरूड (२००५), मंगला (२००६), डेक्कन (२०१०) आणि अभिरुची (२०११) अशी मल्टिप्लेक्स सुरु केली. प्रेक्षक पूर्वी एक पडदा चित्रपटगृहात जात. त्यावेळी नाविन्य असलेल्या ‘मल्टिप्लेक्स’कडे प्रेक्षक मोठ्या संख्येने आकर्षित झाले. प्रारंभी प्रोजेक्टरवर सिनेमा दाखवला जायचा. आता डिजीटलचे युग आहे. परदेशात शनिवारी-रविवारी प्रेक्षकांची गर्दी होते. आपल्याकडे मात्र दररोज चित्रपट पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असतात. जगभर हा मल्टिप्लेक्स चा व्यवसाय जोरात चालू आहे.
प्रश्न - ‘मल्टिप्लेक्स’चे विश्व कसे बहरत गेले?
-भारतातल्या मल्टिप्लेक्सची संंख्या आतो पाचशे मल्टिप्लेक्स आहेत. पुण्यात २६ मल्टिप्लेक्स चित्रपटगृहे असून त्यांच्यातल्या एकूण पडद्यांची संख्या सुमारे दीडशे आहे. सुरवातीपासून सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम या तीन वर्गात तिकीट विक्री होते. मल्टिप्लेक्स सुरु झाले तेव्हाचा तिकीटाचा दर साठ ते ऐंशी रुपये होता. आता तो २५० रुपयांवर गेला आहे. एक वैशिष्ट्य म्हणजे २००१ साली पार्किंगचे दर दुचाकीसाठी दहा आणि चार चाकीसाठी तीस रुपये होते. आताही तेच आहेत. खाद्यपदार्थांचे दर मात्र वाढत गेले. तीस रुपयांचा सामोसा साठ रुपये झाला. उच्च न्यायालयाने खासगी जागेत खाद्यपदार्थ नेण्यास बंदी आणली. त्यामुळे चित्रपटगृह नेहमीच स्वच्छ राहिली. मल्टिप्लेक्सच्या कँटीनमधून दिले जाणारे खाद्यपदार्थ आमच्या जबाबदारीवर दिले जातात. पण एकूण प्रेक्षकांपैकी वीस टक्के लोकच खाद्यपदार्थंाचा आस्वाद घेतात. एकूणच मल्टिप्लेक्सचे आकर्षण वाढले असले तरी प्रेक्षकांचा प्रतिसाद हा चित्रपटावर अवलंबून असतो. मल्टिप्लेक्सच्या आल्यापासून हिंदी चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग वाढला. अपवाद वगळता मराठी चित्रपटसृष्टीत प्रेक्षक खेचण्याची ताकद नाही. मराठीपेक्षा हिंदी चित्रपटांना गर्दी जास्त होते. वर्षभरात १०० ते १२० मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. त्यापैकी ९०-९५ चित्रपट आम्ही लावतो.
प्रश्न - म ल्टिप्लेक्सचे भवितव्य काय?
मार्च-एप्रिल हे परिक्षेचे महिने वगळता इतर वेळी लोक चित्रपटांना गर्दी करतात. भविष्यात मल्टिप्लेक्सची क्रेझ वाढणार असून ‘एक पडदा’ चित्रपटगृहे आता बंद होण्याच्या मार्गावर आहेत.