मुलखावेगळा अतुलनीय ‘शिवाजी’!
By admin | Published: February 19, 2017 02:41 AM2017-02-19T02:41:07+5:302017-02-19T02:41:07+5:30
शिवाजी महाराजांचे चरित्र आजपर्यंत अनेकांनी रेखाटले; पण या सर्व शिवचरित्र वाङ्मयात कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेला चरित्रग्रंथ सर्वांहून वेगळ्या स्वरूपाचा आहे.
- डॉ. जयसिंगराव पवार
शिवाजी महाराजांचे चरित्र आजपर्यंत अनेकांनी रेखाटले; पण या सर्व शिवचरित्र वाङ्मयात कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेला चरित्रग्रंथ सर्वांहून वेगळ्या स्वरूपाचा आहे. या शिवचरित्राची ओळख आजच्या शिवजयंतीनिमित्त..
पोर्तुगीज इतिहासकार कास्मो-द-ग्वार्द हा शिवाजी महाराजांचा पहिला चरित्रकार. त्याने स. १६९५ मध्ये महाराजांचे पोर्तुगीजमध्ये चरित्र लिहिले. त्याच सुमारास राजाराम महाराजांच्या जिंजीच्या वास्तव्यात त्यांचा सेवक कृष्णाजी अनंत सभासद याने मराठीत चरित्र रचले. ते मराठीतील पहिले शिवचरित्र. तिथपासून ते आजच्या काळातील पं. सेतुमाधवराव पगडी- श्री. गजानन भास्कर मेहेंदळेपर्यंत अनेकांनी शिवचरित्रे लिहिली. त्यांची संख्या आजमितीस शंभरच्या आसपास निश्चित भरेल. या सर्व शिवचरित्र वाङ्मयात कॉ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेला चरित्रग्रंथ (खरे तर चरित्रपुस्तिका) सर्वांहून वेगळ््या स्वरूपाचा आहे. याचे कारण कॉ. पानसरे यांचा ‘शिवाजी’ परंपरेने चालत आलेला ‘शिवाजी’ नाही, तो एक ‘मुलखावेगळा शिवाजी’ आहे.
आतापर्यंतच्या शिवचरित्रकारांचा प्रधान हेतू महाराजांचे जास्तीतजास्त सत्याधिष्ठित चरित्र पुराव्यानिशी सादर करणे हा होता व असतो. कॉ. पानसरे यांचा हेतू वाचकांस अधिकृत शिवचरित्र सादर करणे, त्यासाठी पुरावे देणे असा नाही. ते इतिहास संशोधक नाहीत, इतिहासकारही नाहीत, मात्र ते इतिहासाचे अभ्यासक जरूर आहेत. आजच्या लोकशाहीच्या युगात शिवचरित्रापासून काय शिकता येईल, हे वाचकासमोर मांडणे हाच त्यांच्या सर्व विवेचनाचा प्रधान हेतू आहे.
‘‘खरं म्हणजे या आधुनिक लोकशाहीत एका राजाचा उदोउदो का व्हावा? त्या ‘राजाच्या’ विचारात, व्यवहारात आणि चरित्रात असे काय आहे, की त्यामुळे लोकशाहीतसुद्धा त्याचे स्मरण स्फूर्तिदायक ठरावे?’’ असा सरळ सोपा प्रश्न उपस्थित करून ते शिवचरित्रात प्रवेश करतात आणि मग त्याचे उत्तर देताना ते म्हणतात, शिवाजीराजांचे राज्य सामान्य माणसांना, रयतेला आपलेच राज्य वाटत होते. त्यांचे कार्यही आपलेच कार्य वाटत होते, मग याला जोडूनच ते ‘आदर्श राज्याची’ सोपी व्याख्या सांगतात. ‘‘ज्या राज्यातील प्रजेला- सामान्य प्रजेला, बहुसंख्य प्रजेला, बहुजनांना हे राज्य आपले आहे, असे वाटते, ते उत्तम राज्य समजावे!’’
कॉ. पानसरे यांचा इतिहास-विवेचनात वर्तमानातील प्रस्तुततेवर अधिक जोर असे आणि म्हणूनच ते पुढचा सवाल असा टाकतात, की आज आपण लोकशाही राज्यात राहतो; पण सामान्य माणसास असे वाटते का, की हे राज्य आपले आहे? या राज्यात जे काही चालले आहे ते आपल्यासाठी आहे? या प्रश्नाचे प्रामाणिक उत्तर ‘नाही’ असे आहे!
आणि मग शिवाजीराजांचे कार्य हे आपले काम आहे, असे रयतेला वाटत होते, याची अनेक उदाहरणे ते वाचकांसमोर सादर करतात.
शिवाजीराजांचे राज्य हे आपले राज्य असे रयतेस का वाटू लागले, याचा रहस्यभेद करताना कॉ. पानसरे लिहितात, ‘‘शिवाजीचे कार्य सुरू झाले. शिवाजीचे राज्य आले आणि एकदम बदल झाला. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला. भेटू लागला. त्यांची विचारपूस करू लागला. त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला. त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला. जहागीरदार - वतनदारांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागला. वतनदार हे रयतेचे मालक नाहीत, तर राज्याचे नोकर आहेत, असे तो सांगू लागला व त्याप्रमाणे रयतेला अनुभव येऊ लागला.’’
अशाप्रकारे रयतेसाठी राज्य निर्माण करत असता, राज्य चालवत असता, तिच्यावर अत्याचार करणाऱ्या वतनदारांना हा राजा कठोर शासन करीत होता, याचे कारण त्याची न्यायावर जबर निष्ठा होती! कल्याणच्या सुभेदाराचे उदाहरण सांगून कॉ. पानसरे म्हणतात, ‘‘मुसलमान शत्रूची तरणीताठी अन् देखणी सून पाहून आईची आठवण व्हावी... यासाठी चारित्र्यसंपन्नता व सौंदर्यासंबंधीचा निरोगी दृष्टिकोन लागतो. आजच्या तथाकथित शिवभक्त ‘वतनदारा’समोर अन् ‘राजा’समोर अशी कुणी सुंदर स्त्री आली असती, तर त्याने काय उद्गार काढले असते अन् काय केले असते, याची कल्पना करून पाहा, म्हणजे खरा शिवाजी अन् खोटे शिवभक्त यांच्यातला फरक उमगेल!’’
‘शिवाजी व रयत’ या विषयाची चर्चा करताना कॉ. पानसरे यांनी शिवाजीराजास ‘सत्पुरूष’ असे संबोधले आहे! त्याकाळी सैन्य चालले की रयतेच्या उभ्या पिकांची नासाडी ठरलेली असे. काहीवेळा लूटही होई. अशा परिस्थितीत जीव वाचला हेच विशेष, असे रयतेला वाटे. या पार्श्वभूमीवर शिवाजीराजे सैन्याला सक्त आदेश देत होते की, रयतेस काडीइतकाही त्रास होता कामा नये.
कॉम्रेड म्हणतात, ‘‘कल्पना करून पाहा! उभ्या पिकातून बेदरकारपणे दौडत जाणारे व उभे पीक मातीमोल करणारे सैन्य वर्षांनुवर्षे पाहण्याचा प्रसंग ज्यांच्यावर येत असेल, त्यांना जर पिकातून न घुसता रस्त्याने जाणारे आणि पिकांची जराही नुकसानी होऊ नये अशी दक्षता घेणारे शिवाजीचे सैन्य पहावयास मिळाले, तर त्यांना काय वाटेल? रयतेच्या पिकाची काळजी करणारा राजा, त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारे सैन्य आणि हे सर्वजण करीत असलेले कार्य यासंबंधी रयतेला काय वाटले असेल? हा राजा, हे सैन्य आणि हे कार्य आपले आहे, असे रयतेला का नाही वाटणार?’’
स्वराज्यातील वतनदारांनी कारकुनांनी, सुभेदारांनी रयतेशी व्यवहार करताना त्यांच्या भाजीच्या देठासही हात लावता कामा नये, जे काही लागेल ते रोख पैसे मोजून बाजारातून घ्यावे, रयतेपासून अधिकाराच्या जोरावर काही मिळवू नये, अशी सक्त ताकीद शिवाजीराजांची होती. यासंदर्भात चिपळूणच्या लष्करी छावणीस पाठविलेले शिवाजीराजांचे आज्ञापत्र इतिहासात प्रसिद्धच आहे.
शिवाजीराजांच्या सैन्याच्या संदर्भात कॉ. पानसरे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. या राजाचे सैन्य रयतेवर अत्याचार करीत नव्हते, त्याचे कारण ते मुळात रयतेतूनच उभे केले होते. रयतेशी त्यांचा जैविक संबंध होता. ते म्हणतात, ‘‘शिवाजीचे सैन्य बारमाही शिपायांचे नव्हते. काही खडे सैन्य होते, नाही असे नाही. पण, बहुतेक शिपाई शेतीभाती करीत, बायका-मुलांत राहात आणि शिपाईगिरीही करीत... शेतीशी व कुटुंबाशी असे जिवंत व सातत्याचे संबंध असणाऱ्या शिपायांची मानसिकता दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतीची व संपत्तीची काळजी करण्याची असते. इतरांच्या लेकी-सुनांचा आदर करण्याची असते. दुसऱ्यांची शेती व पिके पाहून त्यांना स्वत:ची पिके आठवतात. दुसऱ्यांच्या लेकी-सुना पाहून त्यांना स्वत:च्या लेकी-सुना आठवतात आणि ते अत्याचार करीत नाहीत. नासधूस व लूट करीत नाहीत. अब्रू घेत नाहीत. शेतीशी जिवंत संबंध असलेला माणूस लुटारू होत नाही.’’ कॉ. पानसरे यांची कारणमीमांसा शिवाजीराजांच्या सैन्याच्या वर्तणुकीचा समाजशास्त्रीयच नव्हे, तर मानसशास्त्रीय मीमांसा करणारी आहे, आणि ती उपलब्ध शिवचरित्रात खात्रीने भर टाकणारी आहे.
शिवचरित्रातील आजच्या काळात सर्वांत अधिक प्रस्तुतता लाभलेला विषय म्हणजे ‘धर्म’. कॉ. पानसरे त्याची चिकित्सा न करतील तरच नवल होते. शिवाजी महाराज हे हिंदूंचे राजे होते. त्यांचा लढा इस्लामशी अथवा मुसलमानांशी होता, या हिंदुत्ववादी विचारांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. मुळात शिवाजीराजांचा संघर्ष हा दोन धर्मांचा नसून, दोन राज्यांचा होता; तो एक सत्ता-संघर्ष होता, हे सांगताना त्यांनी हिंदू राजांकडे मुसलमान सेवक व मुसलमान राजाकडे हिंदू सेवक असणारी तत्कालीन इतिहासातील अनेक उदाहरणे सादर केली आहेत. एवढेच नव्हे तर शिवाजीराजाकडे किती मुस्लीम सेवक होते, यांचीही यादी दिली आहे. पुढे ते म्हणतात की, शिवाजीराजा धर्मश्रद्ध हिंदू होता; तो हिंदू देवदेवतांना व साधूसंतांना पूजित होता, हे सर्व खरेच आहे, पण तो इस्लामच्या व मुस्लीम प्रजेच्या विरुद्ध नव्हता. हिंदू देवालयांप्रमाणे तो मशिदींनाही इनामे देत होता. त्याच्या अनेक गुरूंपैकी एक बाबा याकूत हे मुस्लीम होते; तो कुराणाचा आदर करीत होता. हिंदूंना एक वागणूक व मुस्लिमांना दुसरी वागणूक असे तो करीत नव्हता; मुस्लिमांचे ‘हिंदूकरण’ करण्याचा त्याने कधी प्रयत्न केला नाही.
पण, सध्या शिवाजीराजांचे नाव घेऊन मुस्लीम द्वेष पसरविला जातो, राजकारण केले जाते, अशा लोकांचा पर्दापाश करताना कॉ. पानसरे म्हणतात, ‘‘त्यांचा मुस्लीमद्वेष कुठे खपत असेल, तर त्यांनी स्वत:च्या नावाने खपवावा. त्यांच्या मालावर शिवाजीचा शिक्का मारून खपवू नये. तो माल शिवाजीचा म्हणून खपवू नये!’’
शिवाजी महाराजांच्या नावाने व त्यांच्या जयघोषात हिंदू-मुस्लीम दंगे करणाऱ्यांना कॉ. पानसरे ‘शिवाजी कोण होता?’ हे सांगतात; शिवाजी धर्मांध नव्हता. तो हिंदू धर्मावर श्रध्दा ठेवीत होता. पण मुसलमान धर्माचा द्वेष करीत नव्हता. तो श्रद्धावान होता पण अंधश्रद्ध नव्हता!
मुस्लीम बांधवांनाही आवाहन करताना ते म्हणतात, ‘शिवाजीचे स्वराज्य स्थापायला ज्या मुसलमानांचे प्राण खर्ची पडले, ज्यांचे रक्त सांडले ते सुध्दा तुमचेच पूर्वज होते ना? की औरंगजेब तेवढा तुमचा पूर्वज आणि मदारी मेहतर कुणीच नव्हे!...’ शिवाजीने स्थापलेले स्वराज्य फक्त हिंंदूंच्यासाठी नव्हते. ते महाराष्ट्रातील मुसलमानांसाठीसुद्धा होते. पण महाराष्ट्रातील मुसलमानांनी शिवाजी आपला मानला पाहिजे की नको.’’
कॉ. पानसरे यांची ही भूमिका केवळ इतिहासकाराची नाही. ती मुख्यत: समाज-प्रबोधकाची आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याची, त्यांच्यातील बंधुभावाचीआहे. अनेक जातीधर्मांनी बनलेला आपला समाज, आपले राष्ट्र एकसंध ठेवण्याची ही भूमिका आहे. त्यासाठी ते शिवचरित्राकडे राष्ट्रीय ऐक्य निर्माण करणारे एक प्रभावी साधन म्हणून पाहताहेत. त्यांच्या दृष्टीने शिवचरित्र साध्य नाही. साधन आहे. आणि हेच कॉ. पानसरे यांच्या शिवचरित्राचे मुलखावेगळे वैशिष्ट्य आहे.