मुलुंडला घोडागाडी शर्यत उधळली
By admin | Published: December 2, 2014 04:38 AM2014-12-02T04:38:11+5:302014-12-02T04:38:11+5:30
पूर्व द्रुतगती मार्गावर रविवारी पहाटे पोलिसांनी चक्क टांग्यांची (घोडागाडी) अवैध शर्यत उधळून लावली. टांग्यांचा थरार अनुभवण्यासाठी शेकडोंचा जमाव द्रुतगती मार्गावर सज्ज
मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावर रविवारी पहाटे पोलिसांनी चक्क टांग्यांची (घोडागाडी) अवैध शर्यत उधळून लावली. टांग्यांचा थरार अनुभवण्यासाठी शेकडोंचा जमाव द्रुतगती मार्गावर सज्ज असल्याने शर्यतीची आमंत्रणे आधीपासूनच सुटली असावीत. तसेच या शर्यतीवर मोठ्या प्रमाणावर सट्टा लागला असावा, असा दाट संशय कारवाई करणाऱ्या नवघर पोलिसांना आहे.
पहाटे सहाच्या सुमारास शर्यत सुरू होण्याच्या काही मिनिटांआधीच नवघर पोलिसांना खबर मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक संपत मुंढे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील काळे,पीएसआय महेश्वर तळेकर यांंच्यासहित चालक श्याम सिंग आणि पोलीस नाईक अशोक शिंदे पूर्व द्रुतगती मार्गावर पोहोचले. तोवर शर्यत सुरू झाली होती. पाच टांगे वायू वेगाने दौडत होते. ही शर्यत पाहण्यासाठी द्रुतगती मार्गावर मुलुंडच्या मौर्या तलावापासून विक्रोळीपर्यंत दुतर्फा शौकिनांची गर्दी होती. शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी पाच टांग्यांच्या मागोमाग हे शौकीन आपापल्या बाईक आणि कार घेऊन धावत सुटले. त्यामुळे पोलिसांना पाठलाग करावा लागला. यापैकी एक टांगा जागीच अडवून त्यावरील दोघांना ताब्यात घेण्यात आले. दुसरा टांग्याला पकडण्यासाठी नवघर पोलिसांना ऐरोली खाडीपुलापर्यंत पाठलाग करावा लागला.
पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, विल्यम जोसेफ जसेंटो (२१), रसल आॅस्टिन जसेन्टो (३५), रॉनी बोना परेरा (२७) आणि ब्रँडन जॉन पेसो (२०) अशी आरोपींंची नावे आहेत. हे चौघेही वांद्रे, कलिना परिसरात राहणारे असून, हॉटेलमध्ये काम करतात. पोलिसांनी त्यांना भारतीय दंडसंहितेतील कलम २८९ नुसार अटक केली आहे. या चौघांना न्यायालयाने जामिनावर मुक्त केले आहे. या शर्यतीवर वर मोठ्या प्रमाणात सट्टा लागला असावा, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. तसेच या शर्यतीचे आयोजन कोणी केले, याबाबतही पोलीस चौकशी करीत आहेत. (प्रतिनिधी)