मुंबई १६ अंशांवर, दिल्ली ५, अहमदनगर ७ आणि मुंबई १६ अंशांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 05:06 AM2018-01-05T05:06:54+5:302018-01-05T05:14:20+5:30
उत्तर भारतात पडलेल्या कडाक्याच्या थंडीदरम्यानच महाराष्ट्रही थंडीने गारठून गेला आहे. विशेष म्हणजे उत्तर भारत दाट धुक्यात हरविला असतानाच गुरुवारी दिल्लीचे किमान तापमान ५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
मुंबई - उत्तर भारतात पडलेल्या कडाक्याच्या थंडीदरम्यानच महाराष्ट्रही थंडीने गारठून गेला आहे. विशेष म्हणजे उत्तर भारत दाट धुक्यात हरविला असतानाच गुरुवारी दिल्लीचे किमान तापमान ५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे. तर अहमदनगरचे किमान तापमान ७ अंश नोंदविण्यात आले. मुंबईचे (सांताक्रुझ वेधशाळा) किमान तापमान १६.४ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. घटत्या किमान तापमानामुळे गारवा वाढतच असून, पडलेल्या थंडीने मुंबईकर आता चांगलेच गारठले आहेत.
भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. दुसरीकडे मुंबईच्या किमान तापमानात मागील तीन दिवसांपासून घट नोंदविण्यात येत आहे. मुंबईचे किमान तापमान सोमवारी १४, मंगळवारी १५ आणि गुरुवारी १६ अंश नोंदविण्यात आले आहे. विशेषत: सकाळी आणि सायंकाळी वाहणारे गार वारे मुंबईच्या थंडीत भर घालत आहेत. येत्या ४८ तासांसाठी किमान तापमान १६ अंशावर स्थिर राहील, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. परिणामी वाढती थंडी मुंबईकरांना आणखी हुडहुडी भरविणार आहे.
राज्यात सर्वांत कमी किमान तापमान अहमदनगर येथे ७ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.
५ ते ६ जानेवारीदरम्यान विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.
५ आणि ६ जानेवारी - किमान तापमान १६ अंशाच्या आसपास राहील. आकाश मुख्यत: निरभ्र राहील. पहाटेच्या वेळी धुके पडण्याची शक्यता आहे.
राज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान
अंश सेल्सिअसमध्ये
मुंबई १६.४, अहमदनगर ७, पुणे १२.१, जळगाव ९.४, कोल्हापूर १६.८, महाबळेश्वर १४, मालेगाव १२, नाशिक ९.३, सांगली १४.७, सातारा १२.७, सोलापूर १४.९, औरंगाबाद १२, परभणी १२.४, नांदेड १३, अकोला ११.१, अमरावती १२.६, बुलढाणा १३.३, चंद्रपूर १०.७, गोंदिया ७.२, नागपूर ८.२, वाशिम ११.४, वर्धा १०.६, यवतमाळ १०