मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन व्हाया नाशिक नेण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती केंद्राने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 12:14 PM2018-12-07T12:14:35+5:302018-12-07T12:18:27+5:30
नियोजित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा महाराष्ट्रालाही योग्य फायदा व्हावा यासाठी बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकवरून नेण्यात यावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मागणी केंद्र सरकारने फेटाळून लावल्याचे समोर आले आहे.
मुंबई - नियोजित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचामहाराष्ट्रालाही योग्य फायदा व्हावा यासाठी बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकवरून नेण्यात यावा, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली मागणी केंद्र सरकारने फेटाळून लावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच वादात सापडलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनवरून अजून एका वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पाचा महाराष्ट्रालाही व्हावा यासाठी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा मार्ग नाशिकहून वळवण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती. मात्र यावर केंद्राकडून विचार करण्यात आला नाही. दरम्यान, रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी फेटाळली असल्याचे समोर आले आहे.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यासाठी जपानची मदत घेण्यात येत आहे. मात्र विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असलेली टीका आणि भूमिअधिग्रहणास शेतकऱ्यांचा असलेला विरोध यामुळे बुलेट ट्रेनच्या मार्गात अनेक अडथळे येत आहेत.