मुंबईत एलिव्हेटेड प्रकल्प साकारणारच

By Admin | Published: August 23, 2016 06:30 AM2016-08-23T06:30:35+5:302016-08-23T06:30:35+5:30

मुंबई उपनगरीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्यची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.

The Mumbai-based Elevated Project is set to be launched | मुंबईत एलिव्हेटेड प्रकल्प साकारणारच

मुंबईत एलिव्हेटेड प्रकल्प साकारणारच

googlenewsNext


मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेतून प्रवास करणाऱ्यची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यावर एलिव्हेटेड (उन्नत मार्ग) हा एक पर्याय आहे. त्यामुळे एलिव्हेटेड प्रकल्प पूर्ण करणारच अशी ग्वाही रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. मात्र ही कामे १५ वर्षांपूर्वीच करायला हवी होती. त्यामुळे आज समस्या उभी राहिली नसती. आता १५ दिवसांत ही कामे पूर्ण करणे अशक्य असल्याचेही प्रभू म्हणाले.
सुरेश प्रभू यांच्या हस्ते अनेक प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण दादर येथील एका कार्यक्रमात पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. ‘एलिव्हेटेड प्रकल्पांसाठी २0 ते ४0 हजार कोटींची गरज असून त्यासाठी वर्ल्ड बँकेचीही मदत घेतली जात आहे. लवकरच या प्रकल्पांचा आरंभ केला जाईल आणि ते मार्गी लावले जातील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. गेल्या २0 ते २५ वर्षांत वाढलेली लोकसंख्या व वाढलेल्या पायाभूत सुविधा त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लोकल प्रवासातील अडचणी दूर करण्यासाठी कितीही सुविधा पुरवल्या तरी दररोज वाढत जाणाऱ्या लोकसंख्येपुढे त्या कमी पडत आहेत, असे ते म्हणाले.
>प्रकल्पांचे लोकार्पण
हार्बरवर याआधीच सुरु झालेल्या १२ डबा प्रकल्पाचे यावेळी लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर हार्बरवर दोन नविन १२ डबा लोकसाठी प्लॅटफॉर्म, अंधेरी येथे दोन लिफ्ट, गोरेगाव स्थानकात बुकींग आॅफीस, कर्जत, शहाड, कुर्ला, किंग्ज सर्कल, रे रोड, चेंबूर येथे पादचारी पूल, वसई रोड आणि नालासोपारा येथे पादचारी पूल व सरकते जिन्यांचेही लोकार्पण केले गेले.
>दादर स्टेशनला झळाळी
खासगी कंपनीच्या सहकार्याने मध्य रेल्वेने दादर स्थानकाला झळाळी दिली आहे. पूर्वेला गार्डन तयार करतानाच स्वच्छतागृहाचे नुतनीकरण केले आहे. या स्थानकात आसनव्यवस्था, कचरापेट्या बसवतानाच भिंतीही रंगविण्यात येतील.
>लोकल वेळापत्रक
सुधारण्यासाठी प्रयत्न
लोकलचे वेळापत्रक नीट राहावे यासाठी नविन आलेले मध्य व पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच विभागीय रेल्वे व्यवस्थापक अडचणींवर मात करतील. गर्दी व ताण कमी करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रेल्वे महाव्यवस्थापक राज्य शासनासोबत बैठका घेऊन आढावा घेणार असल्याची माहिती प्रभू यांनी दिली.
>अन्य सुविधा
दादर येथे गार्डन, सीएसटी येथे एसी विश्रामगृह, वॉटर रिसायकलिंग प्लान्ट, अपंग व्यक्तींसाठी बायो टॉयलेट, कुर्ला व ठाणे येथे डिलक्स टॉयलेट, महालक्ष्मी येथे पे अ‍ॅण्ड युज टॉयलेट, खार रोड स्थानकात टॉयलेट आणि कल्याण, गोवंडी स्थानकातही नव्या टॉयलेटचे उद्घाटन करण्यात आले. नालासोरा व गोरेगाव येथे तिकीट खिडक्यांबरोबरच बोरीवली येथे जी प्लस टू इमारत आणि नवीन तिकीट खिडक्याही सुरू करण्यात आल्या.
>वायफाय सेवेचे उद्घाटन
पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट, वांद्रे टर्मिनस, वांद्रे (लोकल), दादर, खार रोड व मध्य रेल्वेवरील एलटीटी, दादर, कल्याण येथे वायफाय सेवा प्रवाशांसाठी सुरू करण्यात आली. त्याचे उद्घाटन रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते झाले. दुसऱ्या टप्प्यात सीएसटी, बोरीवली, बेलापूर, भायखळा, कुर्ला, वाशी, पनवेल, अंधेरी व ठाणे स्थानकात मोफत वायफाय सुरू होईल.
>ठाण्याजवळ नवे स्थानक व कल्याण टर्मिनल होणार
ठाणे स्थानकाजवळ आणखी एक नवे स्थानक होणार आहे. त्याचप्रमाणे कल्याण टर्मिनलही उभारले जाईल. यासाठी रेल्वे, राज्य सरकार आणि स्थानिक पालिकांचे सहकार्य घेतले जाणार आहे. राज्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी १० हजार कोटी रुपयांची तरतूद शासनाने अर्थसंकल्पात केली. त्यामुळे काही प्रकल्प पुढे सरकण्यास मदत मिळणार असल्याचे प्रभू म्हणाले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक कारभार येथून चालतो.
महत्वाची कार्यालयेही येथे असून अनेक सोयिसुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. या कार्यक्रमाला महापौर स्नेहल आंबेकर, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, राहुल शेवाळे, श्रीकांत शिंदे, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक जी.सी.अग्रवाल, एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय उपस्थित होते.

Web Title: The Mumbai-based Elevated Project is set to be launched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.