मुंबईने बलाढ्य मोहन बागानला रोखले
By admin | Published: May 4, 2015 02:14 AM2015-05-04T02:14:11+5:302015-05-04T02:14:11+5:30
गोलरक्षक संजीवन घोषने केलेल्या शानदार बचावाच्या जोरावर मुंबई एफसीने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना आय लीग फुटबॉल स्पर्धेच्या
मुंबई : गोलरक्षक संजीवन घोषने केलेल्या शानदार बचावाच्या जोरावर मुंबई एफसीने आपल्या कामगिरीत सातत्य राखताना आय लीग फुटबॉल स्पर्धेच्या २०व्या फेरीत बलाढ्य मोहन बागान संघाला १-१ असे बरोबरीत रोखले. विशेष म्हणजे १-० अशी आघाडी घेतल्यानंतरही विजय मिळवण्यात अपयशी ठरल्याने मुंबईला सलग चौथ्या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले.
चर्चगेट येथील कुपरेज स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने आक्रमक सुरुवात करताना मोहन बागानला दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु त्यांना गोल करण्यात यश मिळवत नव्हते. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला मुंबईच्या घोषने चमकदार कामगिरी करताना मोहन बागानचे आक्रमण रोखले. यामुळे मध्यंतराला सामना गोलशुन्य बरोबरीत राहिला.
दुसऱ्या सत्रात मात्र मुंबईने आघाडी घेतली. ४९व्या मिनिटाला जयेश राणेच्या शानदार कीकवर रेइसंगमेई वाशुमने जबरदस्त हेडर करुन मुंबईला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर चवताळलेल्या मोहन बागानने देखील जोरदार प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश मिळवत नव्हते. अखेर ७५व्या मिनिटाला धनचंद्र सिंगने निर्णायक गोल करताना मोहन बागानला १-१ अशी बरोबरी साधून देत सामना अनिर्णित राखला. दमदार बचाव करुन निर्णायक कामगिरी करणाऱ्या गोलरक्षक घोष सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. या बरोबरीसह एका गुणाची कमाई करुन मुंबई एफसीने गुणतालिकेत १७ गुणांसह सातवे स्थान मिळवले असून मोहन बागानने सर्वाधिक ३२ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. यापुढे १७ मेला मुंबईचा सामना गोवा फातोर्डा स्टेडियमवर डेम्पो एससीविरुध्द होईल. (क्रीडा प्रतिनिधी)